By चैतन्य गायकवाड |
सिन्नर : सिन्नर तालुक्यातील वावी येथील महावितरण कंपनीच्या उपकेंद्रास आज अचानक आग लागली. आज मंगळवार (दि.२१) रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केल्याने धावपळ उडाली. त्यात कंपनीच्या कार्यालयातील लाखो रुपयांच्या वस्तू जळून खाक झाल्या. यावेळेस वरुणराजानेही हजेरी लावल्यामुळे आग विझवण्यात बरीच मदत झाली. या उपकेंद्रास वावीसह दुसंगवाडी, पांगरी असे एकूण तीन फिडर असून त्यावर एकूण ११ गाव जोडली आहेत. या अचानक आलेल्या उच्च दाबामुळे वावी वीज उपकेंद्रातील दुसंगवाडी फिडरने अचानक पेट घेतला व त्याचे रुपांतर मोठ्या आगीच्या प्रमाणात होऊन संपूर्ण कार्यालय जळून खाक झाले.
यावेळी या उपकेंद्रावरील लाईनमन अक्षय खुळे व येथील प्रभारी नियंत्रक सुयोग धुमाळ हे घटनास्थळी उपस्थित होते. मात्र, आगीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने या दोघांची मोठी धावपळ उडाली. त्यांनी गावातील काही तरुणांना संपर्क केला. येथील तरुणांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या तरुणांनी मदत कार्य सुरु केले. यावेळी मात्र आत प्रवेश करण्यासाठी जागा नसल्याने मुख्य प्रवेशद्वार तोडून पाण्याच्या सहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न केले. पाऊस असल्याने आग विझविण्यासाठी पावसाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात हातभार लागला.
त्यानंतर वावी येथील सहाय्यक वीज अभियंता अजय सावळे यांनी तत्काळ अग्निशमन दलाचे कर्मचारी लाला वाल्मिकी, जयेश बोरसे, मंगेश कटारे, लक्ष्मण खैरे आदीच्या पथकाला बोलावून घेतले. या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आग नियंत्रणात आणली. मात्र, तोपर्यंत कार्यालयात असणाऱ्या अनेक वस्तू, त्यात नवीन व जुने वीज मीटर तसेच अनेक महागड्या वस्तू जळून खाक झाल्या. यावेळी वावी येथील माजी सरपंच विजय काटे, संतोष भोपी, संदीप राजेभोसले, अनंत मालपाणी, भैया काटे, योगेश ताजणे, राकेश आनप, अक्षय खर्डे, गणेश काटे आदींनी यावेळी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केल्याने आग नियंत्रणात आणली. यावेळी पाथरे कनिष्ठ अभियंता हर्षल मांडवे, अरिफ कादरी, रतन राऊत, स्वाती वनसे आदी कार्यालयात उपस्थित होते.
सिन्नर तालुक्यातील वावी येथील वीज वितरण कार्यालयाच्या उपकेंद्रावर अचानक उच्च दाब आल्याने दुसंगवाडी फिडरवर अति दाबाने यामुळेच आग लागल्याची घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तातडीने टेस्टिंग तंत्रनिकेतन वायरमन बोलावले असून ,वावी सह तीनही फिडरवरील वीज रात्री उशिरापर्यंत सुरळीत करण्याचे प्रयत्न चालू आहे.