औरंगाबादमधील पैठण येथे एकाने क्रूरतेचा कळस गाठला आहे. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचे केस कापून विद्रुपीकरण केले त्यानंतर तिला बेदम मारहाण करत तिची निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक आणि तेवढीच संतापजनक घटना पैठणमधील घाणेनगर येथे घडली आहे. घटनेने परिसर हादरला असून जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय. लक्ष्मीबाई संतोष जाधव (वय 36) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीबाई यांचा पहिला विवाह झाला होता. पहिल्या पतीपासून एक मुलगा व एक मुलगी होती. काही कारणास्तव लक्ष्मीबाई यांनी संतोष जाधव (रा. संघर्षनगर, घाणेगाव) याच्यासोबत 17 वर्षापूर्वी विवाह केला होता. लक्ष्मीबाई आणि संतोष यांना 14 वर्षांचा एक मुलगा आहे. दरम्यान, काही दिवसांनी संतोष लक्ष्मी यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना सतत मारहाण करू लागला.
हे असे सुरु असताना संतोष याने दोन दिवसांपूर्वी विकृतीचा कळसच गाठला त्याने त्याची पत्नी लक्ष्मीबाई यांच्या डोक्यावरचे केस कापून विद्रुप करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लक्ष्मीला रात्रभर मारहाण केली. त्यानंतर गुरुवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास संतोषने पुन्हा मारहाण केली. यावेळी त्याने लोखंडी सळईने लक्ष्मी यांच्या डोक्यात वार केल्याने त्या गंभीर जखमी होऊन मृत झाल्या.
याप्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वाळूज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी पथकासोबत पाहणी केली. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी संतोष जाधव याला अटक करण्यात आली आहे.