Video : एबीबी सर्कलवर मध्यरात्री भीषण अपघात, चिमुकल्याचा मृत्यू

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरातील एबीबी सिग्नल येथे दोन कारची टक्कर होऊन भीषण अपघात झाल्याची घटना मध्यरात्री घडली. या भीषण अपघातात एका पाच वर्षीय मुलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सिग्नल येथे पहाटे ०१ च्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये महिंद्रा झायलो कार आणि मारुती ब्रिझा या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की, चौकाच्या मधोमध दोन्ही मोटारी उलटल्या आणि त्यामधील प्रवासी बाहेर फेकले गेले. त्यामुळे अपघाताची दाहकता तीव्र होती.

https://www.youtube.com/watch?v=jqekKUIH89s

दरम्यान या अपघातात एका पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर सात ते आठ प्रवासी जखमी असून जखमींमध्ये चार महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. मृत मुलगा आणि जखमींची नावे रात्री उशिरापर्यंत समजू शकली नव्हती.

घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस, तसेच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने घटनास्थळावरून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये काहींच्या डोक्याला आणि हातापायांना जबर मार लागला असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्षामध्ये उपचार सुरू आहे.