सहा वर्षानंतर पहिल्यांदाच विराट कोहलीवर ओढवली नामुष्की

By चैतन्य गायकवाड

नुकत्याच झालेल्या इंग्लंड ( England) विरुद्धच्या पाचव्या कसोटीत भारताचा (India) पराभव झाला. ही कसोटी मालिका भारताने २-२ अशी बरोबरीत सोडवली. या पाचव्या कसोटीत रिषभ पंत, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह असे मोजके खेळाडू वगळता, इतर खेळाडूंना साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यातच विराट कोहली (Virat Kohli) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या फॉर्मबाबत झगडत आहे. या कसोटीत देखील विराटला काही साजेशी कामगिरी करता आली नाही.

दरम्यान, या कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो व भारताचा रिषभ पंत (Rishabh Pant) यांनी आयसीसी कसोटी (ICC men’s test ranking) फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो याने मागील तीन कसोटी सामन्यात दमदार कामगिरी करून दाखवली, त्याच्या दमदार कामगिरीमुळे २०१८ नंतर तो प्रथमच आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत ‘टॉप टेन’ (top ten) मध्ये दाखल झाला आहे.

तसेच भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने भारताकडून सर्वाधिक रेटिंग गुण कमवताना, गुणतालिकेत पाचवे स्थान पटकावले आहे. रिषभ पंतची ही कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत रिषभ पंतने १४६ व ५७ अशी दमदार कामगिरी केली. पंतने मागील सहा कसोटीत दोन शतके व तीन अर्धशतके झळकावली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे त्याने क्रमवारीत सहा स्थानांची सुधारणा केली आहे.

विराट कोहलीची घसरण
दरम्यान, भारताचा माजी कर्णधार विराट कोहली हा आयसीसी कसोटी क्रमवारीत ‘टॉप टेन’ मधून बाहेर फेकला गेला आहे. सहा वर्षानंतर विराट कोहलीवर ही नामुष्की ओढवली आहे. विराट कोहलीने इंग्लंड विरुद्धच्या या पाचव्या कसोटीत दोन्ही डावात अकरा व वीस अशा धावा केल्या. त्याच्या खराब कामगिरीमुळे तो तेराव्या क्रमांकावर घसरला आहे. तब्बल सहा वर्षानंतर विराट कोहली आयसीसी कसोटी फलंदाजांच्या ‘टॉप टेन’ मधून बाहेर गेला आहे.

भारताच्या इतर खेळाडूंत आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या (bowler) क्रमवारीत आर. अश्विन (R. Ashwin) व जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर अष्टपैलू (all-rounder) खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) व आर. अश्विन हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत.