लालूप्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक; दिल्लीतील एम्समध्ये दाखल

By चैतन्य गायकवाड

नवी दिल्ली: बिहारचे माजी मुख्यमंत्री (former CM of Bihar) तसेच राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव (RJD chief Lalu Prasad Yadav) यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना बुधवारी रात्री उशिरा दिल्ली (Delhi) येथील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णालयात वरिष्ठ डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. तसेच त्यांच्यावर उपचार देखील सुरु आहे. लालूप्रसाद यादव यांना बिहारमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, प्रकृती चिंताजनक झाल्याने, त्यांना आधी उपचारासाठी दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले.

लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी सांगितले, “त्यांच्या आरोग्याची संपूर्ण तपासणी केली जात आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सद्यस्थितीत त्यांच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नाही.” दरम्यान, लालूप्रसाद यादव यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी देशभरात प्रार्थना सुरू आहे. पाटणा येथील मंदिर व मस्जिद मध्ये त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली जात आहे.

लालूप्रसाद यादव यांच्या फुफ्फुसात पाणी भरले असून, त्यांच्या खांद्याचे हाड देखील तुटल्याची माहिती मिळाली आहे. तसेच जमिनीवर पडल्याने त्यांच्या शरीराच्या इतर काही भागांना जखमा झाल्या आहेत. याशिवाय त्यांना मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, यूरिक ॲसिड वाढणे, किडनीचे आजार तसेच मेंदूशी संबंधित इतर आजार देखील आहेत. लालूप्रसाद यादव हे अनेक आजारांनी ग्रस्त आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

दरम्यान, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तेजस्वी यादव यांच्याशी फोनवर चर्चा करून, लालूप्रसाद यादव यांच्या प्रकृती विषयी माहिती घेतली. तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) यांनी लालूप्रसाद यादव यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात भेट दिली होती. तसेच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना केली. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Zarkhand CM Hemant Soren) यांनी विमानतळावर लालूप्रसाद यादव यांची भेट घेतली. लालूप्रसाद यादव हे रविवारी माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचे शासकीय निवासस्थानी पायऱ्यांवरून पडले होते, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा उजवा खांदा फ्रॅक्चर झाला आणि पाठीलाही दुखापत झाली. मात्र, सोमवारी त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने, त्यांना पाटणा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.