नाशकात द्राक्ष विक्रीतून फसवणूक; १० लाखांची द्राक्ष पळवली

नाशिक : द्राक्ष नगरी म्हणून ओळख असणाऱ्या नाशिकमध्ये द्राक्ष विक्रीबाबतच फसवणूकीचा (Fraud regarding the sale of grapes) प्रकार घडला आहे. शरद पवार मार्केट ट्रान्सपोर्टमधून दहा लाखांच्या द्राक्षाची परस्पर विक्री केली आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर फसवणुकीच्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. तर एका व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणुकीच्या या घटनेत एका व्यापाऱ्यानेच दुसऱ्या व्यापाऱ्याला फसवले आहे. एका द्राक्ष व्यापाऱ्याने १० लाखांचा मुद्देमाल दुसऱ्या व्यापाऱ्याकडे पोहोचवण्यासाठी दिला होता. मात्र तो माल परस्पर विक्री केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे.

घडलेली संपूर्ण घटना अशी की, नाशिकमध्ये राहणारे व्यापारी करणजीत सिंग औलक यांचे यांचे पंचवटी मार्केट परिसरात ट्रान्स्पोर्टचे दुकान आहे. ते हिरवाडीत वास्तव्यास असतात. ते द्राक्ष शेतकऱ्यांकडून खरेदी करतात आणि मग इतर राज्यात हा माल विक्री केला जातो. दरम्यान अशाच प्रकारे शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला माल त्यांनी दुकानात ठेवला होता. हा माल दुसऱ्या दिवशी लगेचच पाठवायचा म्हणून तो ट्रकमध्ये लोड करण्यात आला. हा जवळपास दहा लाख ४२ हजार रुपये किमतीचा माल होता. काळे आणि हिरवे दोन्ही प्रकारचे द्राक्ष यात होते. कॅरेटमध्ये भरून हा सर्व माल ट्रकमध्ये लोड करण्यात आला आणि ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ट्रक रवाना झाला.

ट्रक रवाना झाल्याच्या नंतर ४ ते ५ दिवस ट्रकबाबत कुठलीच माहिती मुली शकली नाही. २१ फेब्रुवारी ते 25 दरम्यान काहीच माहिती मिळेना. त्यातल्या त्यात ट्रक संबंधित ट्रकचालकाशी देखील कोणताह सपंर्क होऊ शकला नाही. अशात अखेर व्यापाऱ्याने पोलिसांत धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार सांगत पंचवटी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालक, मालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यापाऱ्याचे दुसऱ्या व्यापाऱ्याशी अनेक वर्षांपासून संबंध होते. ते संबंधितांना अनेक वर्षांपासून द्राक्ष माल पुरवत होते. 

नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यंत होतात. देश विदेशातून अनेक व्यापारी हे नाशिकमध्ये येत असतात. नाशिक शहरातील पेठरोडवरील मार्केट मध्ये या व्यापाऱ्यांची मोठी वर्दळ असते. अशातच शरद पवार मार्केट ट्रान्सपोर्टमधून तब्बल दहा लाखांच्या द्राक्षाची परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.