इगतपुरी तालुक्यातील गाजलेल्या तिहेरी खून प्रकरणातील (Triple murder case of Igatpuri taluka) आरोपी सचिन चिमटे (Sachin Chimte) यास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आणि ३ लाख रुपयांचा दंड न्यायालयातर्फे ठोठावण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात ३० जून २०१८ रोजी झालेल्या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण नाशिक जिल्हा खळबळला होता. मिळकतीच्या वादातून आरोपी सचिन चिमटे याने सख्या काकाच्या कुटुंबातील तिघांची हत्या तर एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती.
३० जून २०१८ रोजी माळवाडी, चिमटे वस्ती येथे सकाळी आरोपीने हिराबाई शंकर चिमटे (वय 55) मंगल गणेश चिमटे (वय 30) पुतण्या रोहित गणेश चिमटे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत यांची निर्घृण हत्या केली होती. तसेच पुतण्या यश गणेश चिमटे (वय ६) याच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेबाबत घोटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती एसबी भाटिया यांच्या न्यायालयात झाली सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील श्री अजय मिसाळ यांनी एकूण 12 साक्षीदार तपासले पुराव्यांती न्यायालयाने आरोपीस प्रत्येक खुणाकरता मरेपर्यंत जन्मठेप असे एकूण तीन जन्मठेप तसेच खुनाचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यात एक जन्मठेप अशा एकूण चार जन्मठेपेच्या शिक्षा सुनावली आहे.
या प्रकारच्या सुनावणीकडे आणि निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. आरोपीस एकूण तीन लाख रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. या दंडाची रक्कम मृतांच्या नातेवाईकांना देण्याचा आदेश न्यायालयाने पारित केला आहे. हे प्रकरण अतिशय निर्घृण असून यात तांत्रिक पुरावा आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या माध्यमातून भरपूर पुरावे न्यायालयात सरकारपक्षातर्फे आणण्यात आले आहेत. यामुळे आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.