नाशिक । प्रतिनिधी
नाशिक, पिंपळगाव, त्रंबकेश्वर सह जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे ऑनलाईन रौलेट (Online Roulette) जुगाराचा अड्डा चालून शेकडो जणांना फसवून लाख रुपये कमावणारा रौलेट किंग कैलास शहा (Kailas Shaha) यास निफाड (Niphad) येथून अटक करण्यात आली आहे. त्यास कोर्टात उभे केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
याबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) ठुशी येथील फिर्यादी रामराव बबन रसाळ यांनी पिंपळगाव पोलिस ठाण्यात (Pimpalgoan Police Station) तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार कैलास शहा आणि प्रीतम राजेंद्र गोसावी यांनी रामराव रसाळ यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या मोबाईलवर बिंगो गेम (Mobile Bingo Game) नावाचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून दिले. त्यानंतर ऑनलाईन बिंगो रौलेट जुगार खेळण्यासाठी लागणारे ॲप तसेच मेल आयडी व पासवर्ड पाठवून भरघोस आर्थिक आवक सुरू होईल असे आमिष दाखवून बेकायदेशीर व्यवहार सुरू केला.
दरम्यान या आयडी पासवर्डचा उपयोग करून त्यांनी रसाळ यांची ४५ लाख ४४ हजार ३१५ रुपयांची आर्थिक फसवणूक (Money Fraud) केली. या प्रकरणी शहा विरुद्ध पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक करीत आहेत. त्याच्याविरुद्ध मोक्का कायद्यातील तरतुदीनुसार कारवाईसाठी पोलिसांनी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील (Nashik SP Sachin Patil) यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली.
गेल्या पाच-सहा वर्षांपासून जिल्ह्यात रौलेट किंग नावाने कैलास शहा तरुणांना जाळ्यात ओढत होता. पोलिसांनी वेळोवेळी त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे गंगापूर, भद्रकाली, पंचवटी तसेच पिंपळगाव, त्र्यंबकेश्वर, ओझर, दिंडोरी आदी पोलिस ठाण्यात वेळोवेळी गुन्हे दाखल झाले आहेत. यापुढेही ज्या तरुणांची व नागरिकांची फसवणूक झाली असेल त्यांनी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करावी असे आवाहन पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे.