ठाकरे गट करणार गनिमी कावा; दसरा मेळावा शिवतीर्थावारच…

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असून ठाकरे गट शिंदे गट वाद पुन्हा उच्च न्यायालयात गेला आहे. त्यावर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांनाही मुंबई महापालिकेने परवानगी नाकारली असताना देखील शिवसेनेचा दसरा मेळावा गनिमी काव्याने शिवतीर्थीवरच होणार असे आव्हान मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.


शिवसेना आक्रमक

महापालिकेच्या निर्णयावर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, शिवसेनेचा दसरा मेळावा हा गनिमी काव्याने शिवतीर्थीवरच होणार, असे सांगत शिंदे गटाला आव्हान केले. मुंबई महापालिकेने परवानगी नाकारली असताना महापालिकेच्या या निर्णयानंतर शिवसेनेने आता ओपन चॅलेंज दिले आहे. त्यामुळे दसरा मेळवा वाद आता आणखीच चिघळत असून याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे.

पेडणेकर शिंदे गटावर भडकल्या

 शिंदे गटाला बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये परवानगी मिळालेली असतानाही शिवाजी पार्कसाठी परवानगी मागत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना मानायचं मात्र शिवसेनेची गळचेपी करायची, पक्षातील दलबदलू लोकं आज आमदार-खासदार झाले, ते बाळासाहेबांचे विचार काय पुढे नेणार? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित करत शिंदे गट सध्या भाजपचीच स्क्रिप्ट वाचतोय असा आरोप त्यांनी यावेळी केला.

दसरा मेळाव्यात आवाज कुणाचा?

उद्धव ठाकरे गटानंतर शिंदे गटाने देखील उच्च न्यायालयात धाव घेतली असून आमची शिवसेना म्हणजे खरी शिवसेना आहे त्यामुळे शिवाजीपार्कवर दसरा मेळाव्यासाठी आम्हालाच परवानगी मिळावी अशी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे न्यायालय काय निकाल देते आणि दसरा मेळाव्याला आवाज कुणाचा शिंदे गट की ठाकरे गट हे पाहणे महत्वाचे ठरेल.