नाशिक: काल ठिकठिकाणी गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करत गुरुपौर्णिमा (Guru Poornima) साजरी करण्यात आली. अशात नाशिक येथील डेअरी पॉवर या कंपनीने अतिशय अनोख्या पद्धतीने ही गुरुपौर्णिमा साजरी केली आहे. कंपनीत काम करणारे कंपनीचे सर्व कर्मचारी हे गुरूच अशी भावना मनात ठेवून गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनोखी गुरुदक्षिणा दिली. नाशिकच्या डेअरी पॉवर कंपनीने कंपनीत काम करणाऱ्या तब्बल १२ कर्मचाऱ्यांना एकाचवेळी एसयुव्ही ( Mahindra XUV) कार भेट दिली. त्यामुळे ही बाब या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसह इतरांसाठीही आनंद आणि प्रेरणादायी ठरली आहे.
दूध आणि दूग्धजन्य उत्पादने तयार करणाऱ्या डेअरी पॉवर या कंपनीने आपल्या १२ कर्मचाऱ्यांना महिंद्रा एसयुव्ही ३०० या कारचे गिफ्ट दिले आहे. विशेष म्हणजे, त्यासाठी गुरुपौर्णिमेचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. कंपनीचे सर्व कर्मचारी हे कंपनीसाठी गुरुच आहेत, अशी भावना व्यक्त करीत कंपनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी संचालक दिपक आव्हाड यांनी कर्मचाऱ्यांना सुखद धक्का दिला आहे.
“माझा प्रत्येक कर्मचारी हा माझ्या परिवारातील सदस्यच आहे. त्यामुळे माझ्याकडे काम करणाऱ्या प्रत्येक माणसाकडे घर, गाडी आणि पैसा हे असणं आवश्यकच आहे. माझ्या प्रत्येक माणसाकडे गाडी असणं ही काळाची गरज आहे. ही संधी मला कुणी दिली नाही म्हणून मी या सदस्यांना दिली आहे. जर एक दिपक आव्हाड उभा राहिला तर आज ७५० लोकं उभे राहतात, तर असे जवळपास मला १०० दिपक आव्हाड उभे करायचे आहेत. तरच आपण नाशिकसाठी काहीतरी परिवर्तन घडवू शकू आणि एकूणच या माध्यमातून नाशिक मोठं करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे, नाशिकचं नाव सगळीकडे पोहोचवणं, तसेच वर्तुळ व्यवसाय धोरण वापरून नाशिकचा पैसा हा नाशिक मध्येच कसा राहील यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो” अशी भावना व्यक्त केली आहे.
महिंद्रा एक्सयुव्ही कारची किंमत १२ लाख ६० हजार रुपये एवढी असून तब्बल १२ कर्मचाऱ्यांना तीन रंगात उपलब्ध असलेली ही कार देण्यात आली आहे. नाशिकमध्येच निर्मिती होणाऱ्या महिंद्रा कारचीच यात निवड करण्यात आली. महिंद्राचे डीलर असलेल्या जितेंद्र ऑटोमोटिव्ह या शोरुममध्ये छोटेखानी कार्यक्रम गुरुपौर्णिमेच्या दिवशी साजरा करण्यात आला. त्यात या कर्मचाऱ्यांना ही कार गिफ्ट देण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे कुटुंबियांमध्ये प्रचंड आनंद आणि समाधानाचे वातावरण होते.