नाशिक : स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव सुरु आहे. मात्र आजही राज्यातील आदिवासी गावांना आपल्या मुलभूत गरजांसाठी-सोयीसुविधासाठी संघर्ष करावा लागतोय. सुरगणा तालुक्यातील ५५ गावांनी त्यांचे गुजरातमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी केल्यानंतर आता त्यांच्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्यांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आज मंगळवारी (दि. 6) महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले असून सरकार या आदिवासी बांधवाना न्याय देऊ शकेल का? की हे ग्रामस्थ त्याचं आंदोलन आणखी तीव्र करणार हे चित्र बैठकीनंतर स्पष्ट होणार.
पिण्यासाठी-पाणी नाही, कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा नाही, आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष उलटायला आली मात्र आजही देशाचे मूळ नागरिक आपल्या मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. शेजारील राज्य गुजरात येथील सीमेलगत असलेल्या सर्व गावांना सोयीसुविधा उपलब्ध आहेत. मात्र राज्यातील आदिवासी बांधवांची ही अवस्था म्हणून आता त्यांनी आपल्या हक्कांसाठी एल्गार पुकारला असून राष्ट्रवादी नेते चिंतामण गावित यांच्या नेतृत्वात लढ्याला सुरुवात केली आहे.
तालुक्यातील गुजरात सीमेलगत असलेल्या ५५ गावांतील गावकरी आता आक्रमक झाले असून आमच्या मुलभूत गरजा पुरावा, आम्हाला सुखसुविधा द्या अन्यथा आम्हाला गुजरातेत विलीन करा अशी मागणी केली आहे. यामुळे आता जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. या गावकऱ्यांनी त्यांचा लढा आणखी तीव्र केला असून समितीची स्थापना केली आहे.
सीमावर्ती संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाच्यावतीने सुरगाणा तसेच शेजारील राज्य गुजरात येथील तहसीलदारांना भेटून निवदेन देण्यात आली आहे. काल नवसारी जिल्ह्यातील वासदा येथे जाऊन तहसीलदारांना निवेदन देत गुजरात मध्ये सामावून घेण्याची शिष्टमंडळाने मागणी केली यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
आज जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे हे आता ह्या गावकऱ्यांची मनधरणी करण्यासाठी पुढे सरसावले असून या आदिवासी भागातील समस्या संदर्भात आज पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडत आहेत. बैठकीत सर्व सखोल चर्चा केली जात असून आता या गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याची प्रशासनाला जाग आली आहे.
या बैठकीच्या सुरवातीलाच काही काळ गोंधळ झाला होता. बसण्यास जागा न मिळाल्याने आलेले नागरिक बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा तयारीत असतानाच पालकमंत्री दादा भुसे यांनी मध्यस्थी करत ग्रामस्थांना पुन्हा बैठकीला बोलावले आणि बैठकीला प्रारंभ झाला. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून या आदिवासी बांधवांच्या समस्या सुटणार का प्रश्न तितकाच ज्वलंत आहे.