विधानभवनात गुलाबराव पाटलांची जोरदार फटकेबाजी!

By चैतन्य गायकवाड

मुंबई : आज विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात (special session of legislative assembly) शिंदे सरकारने बहुमत चाचणीत बाजी मारली आहे. या बहुमत चाचणीत शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने १६४ मते पडली, तर विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात ९९ मते पडली. त्यामुळे एकनाथ शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला असून, हे सरकार बहुमतात असल्याचे सिद्ध झाले आहे.

दरम्यान, यावेळी सभागृहात बोलताना गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी जोरदार बॅटिंग केली. त्यांनी जोरदार फटकेबाजी करत आपल्यावर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिले. यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले की, “आमच्यावर बरीच टीका करण्यात बंडखोरी केल्याचं म्हटलं. आम्ही बंड केलेले नाही. आम्ही उठाव केला. आम्ही हिंदुत्वाच्या विचाराशी फारकत घेऊ नये, म्हणून या विचारावर पुन्हा आलो आहोत.”
तसेच शिवसेनेतील या बंडावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “५५ आमदार मधून ४० आमदार कसे फुटतात? आपल्या साधा मेंबर जरी फुटला, तरी त्याची आम्ही विचारपूस करतो. चाळीस आमदार फुटतात ही आजची गोष्ट नाही. बाळासाहेबांना त्यांच्या मुलाला दुःख देण्याची इच्छा नाहीये.”

चहापेक्षा किटली गरम
‘अनेक आमदार आपली व्यथा मांडायला जायचे. पण चहा पेक्षा किटली गरम असा प्रकार होता. आम्ही सहज आमदार झालो नाही. भगवा झेंडा हाती घेऊन इथपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत.’ असे म्हणताना गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या माणसांवर टीका केली.

शिवसेना वाचवण्याची जबाबदारी आमची
तसेच शिवसेना संपण्याच्या वाटेवर आहे, या मुद्द्यावर मत व्यक्त करताना गुलाबराव पाटील म्हणाले, भास्कर जाधव यांनी काळजी करू नये. ही शिवसेना संपणार नाही. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना उभी ठेवणार आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवसेना जर संपत असेल तर वाचवण्याची जबाबदारी आमची आहे. आम्हाला गद्दार, गटाराचे पाणी, डुक्कर, तुमची प्रेतं बाहेर येतील, वरळीवरून जाऊ शकत नाही असं म्हटलं. धमकी द्यायचा धंदा आमचाही आहे. लेचेपेचे म्हणून आमदार झालो नाही. मनगटात जोर असलेला माणूस मैदानात येतो आणि सत्तेत सामील होतो, असे गुलाबराव पाटील म्हणाले.