शिवसेनेतील ४० आमदारांनी वेगळी भूमिका घेत एक वेगळा गट स्थापन करत राज्यात भाजप सोबत सत्ता स्थापन केली आहे .या नंतर आता राज्यात शिवसेनेचे दोन गट स्थापन झाले आहेत .ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सध्याची शिवसेनेची राजकीय भूमिका पहायला मिळत आहे. या दोन गटात आरोप प्रत्यारोप पहायला मिळत असले तरी आता एक एक करून शिंदे गटातील आमदार संजय राऊत यांच्यावर नाराजी व्यक्त करत आहेत.
आता गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्ही बंडखोर नाहीच, आम्ही शिवसेनेतच आहोत, पण नासक्या भाजीबद्दल काही बोलणार नाही, असं म्हणत शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे बंडखोरांनी काय ते एक कारण सांगावं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता. आज जळगावमध्ये माध्यमांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना हे प्रत्युत्तर दिलं आहे.
‘पुढे पाटील म्हणाले आमचा पक्ष वाढवण्यामध्ये आमचे लोक कमी पडले, तो पक्ष वाचवण्यासाठी आम्ही हा उठाव केला आहे. आम्ही बंडखोर नाहीच, आम्ही शिवसेनेतच आहोत. उलट आम्ही शिवसेना वाचवतोय, त्यासाठी आम्ही मंत्रिपदे सोडली, कुणी मायचा लाल ग्रामपंचायतचं सरपंचपद सोडत नाही, असंही गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं.आमचा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल विरोध नाही ते आम्हाला आदराचे आहेत. कोण माणूस शुक्राचार्य आहे तो तुम्हाला माहिती आहे, त्याने आमच्या पक्षाचा सत्यानाश केलाय, तो पक्ष आम्ही वाचवतोय, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
संजय राऊत आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये रोजच शाब्दिक चकमक होत असल्याचे बघायला मिळत आहे त्यामुळे शिंदे गटातील आमदारांचा रोष संजय राऊत यांच्यावरच असल्याचा दिसत आहे.हे आमदार संजय राऊत यांच्यावरच नाराज असल्याचे चित्र आता कुठेतरी स्पष्ट होताना दिसत आहे .