अहमदाबाद : काँग्रेस (Congress) पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर पाटीदार नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा रंगल्या होत्या. आता स्वतः हार्दिक पटेल यांनीच या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. हार्दिक पटेल हे गुरूवार २ जून (June) रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी ‘एएनआय’ (ANI) या वृत्तसंस्थेशी बोलताना यासंदर्भातील माहिती दिली.
हार्दिक पटेल यांनी काही दिवसांपूर्वीच नेतृत्वावर नाराज होऊन काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा (resignation) दिला होता. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्रं लिहिलं होतं. या पत्रातून त्यांनी राज्य नेतृत्वावर टीका करतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावरही टीका केली होती. तसेच काँग्रेस नेत्यांकडून गुजराती लोकांचा कसा अपमान केला जात आहे. गुजराती लोकांच्या अस्मितेला ठेच पोहोचवण्याचं काम कसं केलं जात आहे या मुद्द्यांवर काँग्रेसवर टीका केली होती. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांवरून आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत गुजराती अस्मितेचाच मुद्दा अधिक गाजण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान हार्दिक पटेल यांनी काँग्रेस सोडल्यानंतर ते काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागलं होतं. ते लवकरच भाजपमध्ये (BJP) प्रवेश करतील अशा चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.
पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी नेतृत्व केल्यानंतर २०१५ मध्ये हार्दिक पटेल चर्चेत आले होते. त्यानंतर २०१७ सालच्या विधानसभा निवडणुकीत (Legislative Assembly Election) काँग्रेसला या आंदोलनाचा फायदाही झाला होता. त्यानंतर २०१९ मध्ये हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. जुलै २०२० पासून ते गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून पदभार सांभाळत होते.
१७ मे रोजी दिला राजीनामा……
खूप दिवसांपासून काँग्रेस नेतृत्वाविरोधात नाराजी व्यक्त करणाऱ्या हार्दिक यांनी १७ मे रोजी ट्विटरवरून (Twitter) राजीनामा जाहीर केला होता. त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर तसेच राहुल गांधींवर अनेक आरोप केले. या वर्षाच्या अखेरीस गुजरात विधानसभेची निवडणूक होण्याआधीच त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांच्याकडे राजीनामा पाठवला. राजीनाम्यानंतर ते सातत्याने भाजपच्या कार्याचे कौतुक करत होते. त्यांनी CAA, NRC चा मुद्दा असेल तसेच जम्मू काश्मीर मधून कलम ३७० हटवणे असेल, अयोध्येतील राम मंदिर व GST या मुद्द्यांवर भाजपचे कौतुक केले होते. तेव्हापासून ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
दरम्यान, पाटीदार समाजाचे प्रमुख नेते असलेले हार्दिक पटेल यांच्या भाजपा प्रवेशाने आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दोन दशकांपासून गुजरात मध्ये सत्तेत असलेल्या भाजपला हरवणे काँग्रेससाठी अवघड झाले आहे.