मोठी बातमी! मंकीपाॅक्स संदर्भात आरोग्य विभागाचे मार्गदर्शक तत्वे जारी

केरळमध्ये मंकीपॉक्सची (Monkeypox) लागण झालेले २ रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. देशात मंकीपॉक्सचे जास्त रुग्ण अद्याप आढळून आलेले नसले तरी जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) सर्व देशांना सावधानतेचा इशारा याआधीच दिला आहे. अशात कोणीही घाबरुन जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले असून महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाच्यावतीने मार्गदर्शक तत्वे देखील जारी करण्यात आले आहे. मंकीपाॅक्स हा एक संसर्गजन्य रोग आहे. त्यामुळे रुग्णाच्या निकट असणाऱ्यांचे देखील सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. ज्या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ, बंदर आहेत. तिथे मंकीपाॅक्स संदर्भात सर्वेक्षण सुरू ठेवावं, संशयित रुग्णांना तात्काळ विलगीकरणात ठेवावं असे निर्देश देण्यात आले आहेत.

मंकी पॉक्स न होण्यासाठी घ्यावयाची काळजी

मंकीपाॅक्स न होण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागातर्फे काय काळजी घ्यावी हे सांगण्यात आले आहे. त्यात रोगाबद्दल जनजागृती करणे, संशयित रुग्णाला तात्काळ विलग करणे, रुग्णाच्या कपड्यांची किंवा त्याच्या अंथरून, पांघरूणाशी संपर्क न येऊ देणे, हातांची स्वच्छता ठेवणे, आरोग्य संस्थांमध्ये रुग्णांवर उपचार करताना पीपीई किटचा वापर करणे. याचा बाबींचा समावेश आहे.

मंकीपॉक्स रुग्ण व्यवस्थापन आणि विलगीकरण

रुग्णाला विलगीकरण कक्षात किंवा घरच्या घरी वेगळ्या खोलीमध्ये ठेवणं आवश्यक आहे. या ठिकाणी स्वतंत्र व्हेंटिलेशनची असावे, रुग्णांनी ट्रिपल लेयर मास्क वापरावा, रुग्णाच्या कातडीवरील पुरळ फोड नीट झाकले जावे. त्यासाठी रुग्णांने लांब बाह्याचे शर्ट आणि पायघूळ पॅन्ट वापरावी,
जोपर्यंत रुग्णाच्या शरीरावरील पुरळ/ फोड पूर्ण बरे होत नाही, त्यावरील खपल्या निघून जात नाही तोपर्यंत रुग्णाला विलगीकरणात ठेवणं आवश्यक आहे, रुग्णाला लक्षणांनुसार उपचार देणे, पुरेशा प्रमाणात हायड्रेशन मिळेल याची दक्षता घेणे गरजेचे आहे, रुग्णाला जास्त त्रास होत असेल तर तात्काळ तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

विस्तारात पहा मंकीपाॅक्स संदर्भात राज्य प्रशासनाने जारी केलेले मार्गदर्शक तत्वे :-

https://in.docworkspace.com/d/sICmV15hBzaH5lgY