अतिवृष्टीने चांदवडला झोडपलं ! बंधारा फुटून शेकडो एकरावरील पिकं पाण्याखाली

नाशिक : चांदवड तालुक्यातील पूर्व भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने चांगलेच नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांची तारांबळ उडाली. चांदवड तालुक्यातील पिंपळगाव ढाबळी येथे जोरदार पाऊस होऊन केटीवेअर बंधारा फुटल्याने नदीला महापूर आला होता. बंधारा फुटल्यामुळे नदीपात्राच्या बाजूला असणाऱ्या शेतांमध्ये पाणी घुसल्याने पिंपळगाव, धाबळी, रायपूर बडाने, वागदर्डी आदी गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. या गावातील नदी वागदर्डी धरणाला जाऊन मिळते. पाणी पातळीची वाढ झाल्यामुळे शेकडो एकरावरील पिके पाण्याखाली गेली असून प्रचंड नुकसान झाले आहे. टोमॅटो, मका, बाजरी, सोयाबीन ही पिके पूर्ण जमीनदोस्त झाली असून प्रशासनातर्फे झालेल्या नुकसानाचे सरसकट पंचनामे करून आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र नाशिक जिल्ह्यात अद्यापही काही ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी6 लावली आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे आणि या पावसामुळे नागरिकांचे प्रचंड प्रमाणात हाल झाले आहेत. कालही नाशिकमध्ये सिन्नर तालुक्यात अशाच प्रकारे ढगफुटी सदृश्य पावसामुळे हाहाकार उडाला होता. यामध्ये सिन्नर तालुक्यात एक शेतकऱ्याची मोठी हानी झाली आहे. सोमवारी झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे पाझर तलाव फुटला आणि शेजारीच असलेल्या शेतकऱ्याच्या पोल्ट्री शेडमध्ये पाणी घुसले त्यामुळे पोल्ट्रीत असलेल्या १२००० कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. यामुळे या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.

हवामन विभागाचा अंदाज

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पाऊस पडत आहे. राज्यात काहीसा पावसाचा जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी मात्र जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह, ठाणे परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं. तसेच वाहतुकीवर देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज देखील राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.