नाशकात तुफान पाऊस..शॉक लागून एकाचा मृत्यू.. पाण्याचा विसर्ग वाढवला..

नाशिक : नाशिक शहरात गेल्या दोन तीन तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शहरात ठीक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागात वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणत झाली आहे. मुख्यतः सराफ बाजारात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याची परिस्थिती आहे. द्वारका, मखमलाबाद लिंक रोड, गोविंद नगर, मुंबई नाका या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. ट्रॅफिक पोलिसांना भर पावसात ट्रॅफिक मोकळी करावी लागली. तसेच प्रचंड पाणी साचलेल्या रस्त्यातून वाट काढत नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. परिणामी पावसाचा चांगलाच फटका नागरिकांना बसला आहे.

तसेच गणपतीचा देखावा बघण्यासाठी देखील आज शेवटचा दिवस होता. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेवटच्या दिवशीही नागरिकांना गणपतीचा देखावा पाहण्याचा आनंद घेता आला नाही. त्यामुळे गणेश भक्तांच्या उत्साहावर पाणी फेरले. त्याच पद्धतीने नाशिक शहर आणि परिसरात तसेच धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दीड हजार क्युसेक एवढ्या प्रमाणात गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

मात्र, शहरात पावसाचा जोर कायम असल्याने रात्री दहा नंतर आणखी 1000 क्युसेक असा एकूण 2500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना देखील सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

तर शहरात एक दुर्दैवी घटना देखील घडला आहे. शॉक लागून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पावसाच्या पाण्यातून पायी जात असताना शॉक लागून मृत्यू झाला आहे. शहरातील पाखलरोड भागात ही घटना घडली आहे.