एवढ्या दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने अखेर आज पहाटेपासून नाशिक जिल्ह्यात हजेरी लावली आहे. जून महिन्यात दडी मारून बसलेल्या पावसाची आज पहाटेपासून संततधार सुरू असल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी या तालुक्यांमध्ये दीर्घ विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी चार ते पाच दिवसांपासून पावसाच्ये दमदार सरी बरसल्यामुळे धरण साठ्यात देखील वाढ होत आहे. नाशिक जिल्ह्याच्या विविध भागात पावसाचा जोर कायम असून इगतपुरी तालुक्यात ९६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर सुरगाण्यात ६२ मिमी, त्र्यंबकेश्वरमध्ये ४३.८ मिमी, दिंडोरीत २३ मिमी, नाशिकमध्ये १२ मिमी एवढ्या अशी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यातील काही भागांत पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
इगतपुरीत धुवाधार, पर्यटनाला वेग
पावसाचे माहेरघर समजल्या जाणार्या इगतपुरी तालुक्यात २४ तासांमध्ये ९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने दारणा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. इगतपुरीत पावसाच्या दमदार आगमनाने दारणा धरण २७.६० टक्के एवढ्या प्रमाणात भरले आहे. त्याबरोबरच इगतपुरी जास्त पर्जन्यमानाचे ठिकाण आहे. त्याची पर्यटनासाठी ख्याती असल्याने कोरोनामुळे दोन वर्षापासून फिरण्याची वाट पाहणारे पर्यटक आता इगतपुरीच्या नयनरम्य परिसरात गर्दी करू लागले आहे. इगतपुरी परिसरात अनेक लहान-मोठे धबधबे, घाटाचा भाग व धरण परिसर असल्याने आता पर्यटनाला वेग आला असून स्थानिक व्यावसायिकांमध्ये समाधानच वातावरण दिसत आहे.
पावसाच्या पुनरागमनाने शेतकऱ्यांना दिलासा
आज पहाटेपासूनच पावसची संतत धारा कोसळत असून आता कुठेतरी नाशिकमधील शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. शेतात पेरणी करून ठेवली असताना बळीराजा दमदार पावसाची वाट पाहत होता. जुन महिना उलटून गेल्यानंतरही शेतीसाठी आवश्यक असा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच संकट ओढावत होत. परंतु आता पावसाने जोर धरला असून शेतकऱ्यांना कुठेतरी आता दिलासा मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत असून शेतीच्या कामाला वेग आला आहे.
नाशकात पावसाच्या संततधारा
एकदा आगमन केल्यानंतर नाशिककडे पावसाने पाठ फिरवली होती. आता आज पुन्हा नाशिक शहरात पहाटेपासून पावसाच्या संतत धारा कोसळू लागल्या आहेत त्यामुळे जुन महिन्यानंतर जुलैमध्ये हा चांगलाच पहिला पाऊस झाल्याने आता रस्त्यावरही पाण्याचे तळे साचलेले दिसत आहे. राज्यात अनेक भागात पावसाची धुवाधार फायरिंग झाली असताना नाशकात मात्र पावसाने पाठ फिरवली होती. जुलैच्या पाहिल्या आठवड्याच्या अखेरीस का होईना पावसाने नाशिकमध्ये हजेरी लावली आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला होता. त्यामुळे नाशिक शहरावर पाणीकपातीचे संकट घोंगावत होते. आता हा परतीचा पाऊस जर असाच चालू राहिला तर धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊन नाशिक शहरातील पाणीकपातीचे संकट टळू शकते.