हिंगोली जिल्ह्यातील एक गाव पाण्याखाली; मुसळधार पाऊस सुरु

By चैतन्य गायकवाड

हिंगोली : सध्या राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. मराठवाड्यातील हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला असून, या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. हिंगोली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील प्रमुख नदी असलेली आसना (Asana) या नदीला पुराचा मोठा फटका बसला आहे. या नदीला आलेल्या पुरामुळे अनेक मंदिर तसेच शाळा पाण्याखाली गेल्या आहेत. या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नदी काठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून (district administration) सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. आसना नदीच्या काठी असलेले कुरुंदा (Kurunda) नावाचे गाव पाण्याखाली गेल्याची माहिती मिळाली आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे नदीपात्रातून पाणी थेट गावात शिरले असून, अनेक कुटुंबांच्या संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. पावसामुळे विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून, मोबाईल नेटवर्क देखील बाधित झाले आहे. या पूरबाधित गावांमध्ये प्रशासनाकडून मदत पोहोचवण्याची तयारी सुरू आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis) हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. मात्र, ते या परिस्थितीबाबत पूर्ण आढावा घेत आहे. दरम्यान, राज्यात हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने, आसना नदीला पूर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. एकनाथ शिंदे यांनी या पुरस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून (collector) माहिती घेतली. एकनाथ शिंदे यांनी गाडीतच जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून, त्यांच्याकडून या परिस्थितीची माहिती घेतली. तसेच पूरग्रस्तांची सर्व व्यवस्था करावी. तसेच कोणतीही जीवितहानी होणार नाही, यास प्राधान्य देण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोली जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला

हिंगोली जिल्ह्यात गेल्या २४ तासात जवळपास ६६.७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील बाळापुर, डोंगरकडा, वारंगा, आंबा, गिरगाव, कुरुंदा या सहा मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तर कयाधू (Kayadhu), आसना (Asana), जलेश्वर (Jaleshwar) या नद्यांना पूर आला आहे. या पावसाने पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे.