एकनाथ शिंदे यांच्या आरोपावर गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण..

By चैतन्य गायकवाड |

मुंबई : शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shivsena leader and minister Eknath Shinde) यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home minister Dilip Walse-Patil) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. बंडखोरी केलेले शिवसेना आमदार आणि अपक्ष आमदार यांचे पोलीस संरक्षण राज्य सरकारने काढून घेतले आहे, असा गंभीर आरोप एकनाथ शिंदे यांनी केला होता. या आरोपांच्या पार्श्वभूमवीर आता राज्य सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. खुद्द गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीच ट्विटरवरून यासंदर्भात खुलासा केला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचा हा दावा फेटाळला आहे. राज्य सरकारने कोणत्याही आमदारांची सुरक्षा काढून घेतलेली नाही. कुटुंबियांची सुरक्षा काढलेली नाही. आमदारांच्या घरांना सुरक्षा कायम आहे. पण आमदारांची सुरक्षा राज्यापुरती मर्यादित आहे. सुरक्षा काढण्याचे कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत. राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आमची आहे. पोलिस राज्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, असंही दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले आहे.

गृहमंत्री म्हणाले की, ‘राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत.’

काय म्हणाले होते एकनाथ शिंदे…

एकनाथ शिंदेंनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक पत्र शेअर केले आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस विभागाला हे पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये आमदारांची सुरक्षा काढून घेण्यात आल्याचा, उल्लेख त्यांनी केला आहे. “राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. गेल्या अडीच वर्षात मविआतील घटक पक्षांकडून अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते व आहे”, असं आपल्या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. या पत्रावर ३८ आमदारांच्या सह्या असल्याचे देखील दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या याच दाव्यावर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

कुणाचीही सुरक्षा काढण्याचे आदेश गृह विभागाने दिलेले नाहीत. उलट या सर्व आमदारांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. काही विधानसभा सदस्य इथे नसतील, तर सेक्युरिटीचे लोक त्यांच्या घरी जाऊन बसणार नाहीत. ते ऑफिसला जाऊन दुसरं काम करतील. त्यामुळे जाणीवपूर्वक कुणीही काही करत नाही. यात राजकारणाचा भाग नाही. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही आमची जबाबदारी आहे”, अशी प्रतिक्रिया यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.