धक्कादायक..! भर पावसात कोसळले घर अन..

नाशिक: सुरगाणा तालुक्यात (Surgana Taluka) सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील नवापूर भदर (Navapur Bhadar) येथे घर कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही. मात्र घर आणि घरातील जीवन उपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. अशात पावसामुळे सुरगाणा तालुक्यात घर कोसळल्याची घटना घडली आहे. सुरगाणा तालुक्यात सात ते आठ दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे भदर ग्रामपंचायत मधील नवापूर येथील बाळू तुळशीराम गावित (Balu Tulashiram Gavit) यांचे राहते घर भर पावसात कोसळल्याने भिंती, वासे, कौल यांचे नुकसान झाले आहे. संततधार पावसामुळे लाकडाची झिज होऊन भिंती ओल्या झाल्याने दुपारी ११ ते १२ वाजेच्या सुमारास घर कोसळल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने कुटुंब भात लागवडीसाठी मजूरीकरीता शेतात असल्याने बचावले. अन्यथा खुप मोठी दुर्घटना घडली असती. मात्र राहण्याचा एकमेव निवारा कोसळल्याने भर पावसाळ्यात रहायचे कोठे असा प्रश्न आता गावित कुटुंबाला पडला आहे. घरातील संसारोपयोगी साहित्य व धान्य भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. अशात मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबाला राहण्यासह उपासमारीची देखील वेळ आली आहे.

अशा हालाखीच्या परिस्थितीत आता गावित कुटुंबाने जायचं कुठे, राहायचं कुठे आणि खायचं काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे या घटनेची नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने गंभीर दखल घेऊन तात्काळ पंचनामा करावा अशी मागणी कुटुंबीयांसह ग्रामस्थांकडून होऊ लागली आहे.