लष्करी भागात ड्रोनच्या घिरट्या; नाशिक पोलीस आयुक्त ॲक्शन मोडवर

नाशकातील लष्करी हद्दीत ड्रोनच्या घिरट्या प्रकरणाची महाराष्ट्र गृह विभागाने गंभीर दखल घेतली असून याच पार्श्वभूमीवर आज नाशिक पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. बैठकीत लष्कराचे मोठे अधिकारही उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे. आधी आर्टलरी सेंटर आणि आता आडगाव परिसरातील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) इथे ड्रोनने घिरट्या घातल्या, त्यामुळे असे प्रकार वारंवार घडले असून यामुळे लष्करी हद्दीत कोणी रेकी तर करत नाही ना असा संशय बळावत आहे.


नाशकातील लष्करी भागांवर रेकी होतेय?

नाशिक शहरात लष्करी हद्दीत विनापरवाना ड्रोन उडवण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. त्यात पहिली घटना ५ ऑगस्टला रात्री दहा वाजेच्या सुमारास आर्टिलरी सेंटर परिसरात ड्रोन उडाला होता. त्यात रात्रीच्या सुमारास काही मिनिटे आर्टिलरी सेंटरवर ड्रोनने घिरट्या घातल्या होत्या, ही बाब अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तो ड्रोन पडण्याचा प्रयत्न केला मात्र काही वेळातच ड्रोन गायब झाला होता. अद्याप त्या घटनेचा शोध लागला नाहीये की हा ड्रोन कोणी व का उडवला होता त्यातच पुन्हा २ दिवसापूर्वी अशी घटना घडल्याने खळबळ उडाली.


त्यात पुन्हा एकदा शुक्रवारी ( दि. २३ ) एकदा लष्करी हद्दीत ड्रोन ने रेकी करण्याचा प्रकार उघडकीस आला. आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) परिसरा ड्रोन उडवण्यात आला होता. DRDO तिल एका हवालदाराने दिलेल्या तक्रारीनंतर आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गृह विभागाची गंभीर दखल

विनापरवाना लष्करी हद्दीत ड्रोन उडवल्याने या घटनेची गृह विभागाने गंभीर दखल घेतली आहे. कारण नाशकातील लष्करी हद्दीवर रेकी होतेय असा अधिकाऱ्यांचा दाट संशय आहे. त्यानुषंगाने आज नाशिक पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी बोलावेल्या बैठकीत लष्करातील मोठे अधिकारी उपस्थित राहणार असून या सर्व प्रकारावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गृह तसेच लष्कर विभाग या सर्व प्रकारावर काय कडक पाऊले उचलणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.