बारावीचा निकाल जाहीर… मुलींनी मारली बाजी…

By चैतन्य गायकवाड |

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च-एप्रिल (March-April) महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी (HSC) परीक्षेचा निकाल जाहीर (result declared) करण्यात आला आहे. यंदाचा राज्याचा निकाल ९४.२२ टक्के इतका लागला आहे. तर यंदाच्या निकालात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९७.२१ टक्के इतका लागला आहे. या निकालात कोकण विभाग अव्वल असून मुंबई विभाग शेवटी आहे. तर यंदाही मुलींनी बाजी मारल्याचे निकालात दिसत आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल महामंडळाच्या वेबसाईटवर ऑनलाईन पाहता येणार आहे.

विभागानुसार निकाल … पुणे विभाग : ९३.६१ टक्के, नागपूर विभाग : ९६.५२ टक्के, औरंगाबाद विभाग : ९४.९७ टक्के, मुंबई विभाग : ९०.९१ टक्के, कोल्हापूर विभाग : ९५.०७ टक्के, अमरावती विभाग : ९६.३४ टक्के, नाशिक विभाग : ९५.०३ टक्के, लातूर विभाग : ९५.२५ टक्के, कोकण विभाग : ९७.२१ टक्के .

मुलींनी मारली बाजी … यावर्षी राज्यातील १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यामध्ये ८ लाख १७ हजार ६११ मुले, तर ६ लाख ६८ हजार ८८ मुलींचा समावेश होता. यापैकी ९५.३५ टक्के मुली पास झाल्या असून ९३.२९ टक्के मुले पास झाले आहेत. या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे मुलींचा निकाल मुलांच्या निकालापेक्षा २.०६ टक्क्यांनी अधिक आहे. राज्यातील एकूण १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थ्यांपैकी १३ लाख ५६ हजार ६०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात मुलींचे प्रमाण अधिक आहे.

शाखानिहाय निकाल … विज्ञान : ९८.३० टक्के, वाणिज्य : ९१.७१ टक्के, कला : ९०.५१ टक्के, व्यवसाय अभ्यासक्रम ९२.४० टक्के.

यंदाचा निकाल खास … गेल्या दोन्ही वर्षी कोरोनाच्या महामारीमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्यातच दहावी आणि बारावी दोन्ही वर्गांच्या परीक्षा ऑनलाईन झाल्या होत्या. त्या परीक्षांचा निकालही ऑनलाईन जाहीर झाला होता. यावर्षी मात्र कोरोनाची लाट ओसरल्याने रुग्ण संख्या कमी झाली होती. त्यामुळे शासनाने सर्व निर्बंध शिथिल करून व्यवहार सुरळीत चालू केले होते. शाळा, महाविद्यालये देखील नियमित सुरु होते. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षाही ऑफलाईन घेण्यात आल्या होत्या. दोन वर्षांनंतर या परीक्षा ऑफलाईन घेण्यात आल्या. त्यामुळे आज जाहीर झालेला बारावीचा निकाल हा खास ठरणार आहे. या निकालाबाबत विद्यार्थी तसेच पालकांच्या मनात सुद्धा उत्सुकता निर्माण झाली होती.