कोरोनात पती गेले, आता बँकेकडून घरावर जप्ती; नाशकतील विधवा महिलांची व्यथा..

नाशिक : कोरोना आला आणि अनेकांचे आयुष्यच उध्वस्त होऊन गेले, मात्र त्याची धग अजूनही कमी झालेली नाहीये. कोरोना काळात अनेक लोक मृत्युमुखी पडले असून त्यांच्या कुटुंबीयांची घडी बसलेली नसताना त्यांच्यासमोर आता रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या आधी अनेकांनी बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जाची परतफेड त्यांच्या पश्चात आता विधवा महिला करू शकत नसल्याने बँकेकडून जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याच्या नोटिसा या विधवा महिलांच्या माथी आल्यात. या जवळपास 25 ते 30 महिला असून यांनी आपली व्यथा पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे मांडली असून यावर काही तोडगा काढू असे आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले आहे.

कोरोनाच्या लाटांमध्ये अनेकांचे संसार उघड्यावर आले, त्यात काहींनी आपल्या संसाराचा गाडा बसवायला आता कुठे सुरुवात केली होती मात्र पुन्हा त्यांच्या अवतीभवती कर्जाचा फास लटकलाय. कोरोनाच्या आधी अनेकांनी गृह कर्ज घेतलेली आहेत. मात्र कोरोना आला आणि शहरात अनेकांचा मृत्यू झाला. यात त्यांच्या नावाने गृहकर्ज मात्र तसेच राहिले. त्यांच्या वारसदार म्हणून आता त्यांच्या विधवा पत्नीकडे आता बँकेचे अधिकारी कर्मचारी पैश्यांचा तगादा लावत आहेत.

या विधवा महिला आता कुठे मुख्य प्रवाहात येत तुटपुंजी कमाई करत आहेत. मात्र बँकेकडून घेतलेले कर्ज आणि त्याचे भरमसाठ हप्ते भरण्याची त्यांची एवढी कुवत नाही. म्हणून बँकेकडून त्यांच्या घरांवर जप्तीच्या नोटिसा त्यांच्या माथी मारल्या जात आहेत.

यावर आता शासनाने काही तोडगा काढावा म्हणून या जवळपास 25 ते 30 महिला पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे व्यथा मांडायला गेल्या होत्या. यावर बोलताना, दादा भुसे यांनी ज्यांनी लोन दिले आहे, त्यांनी सक्तीची वसुली करू नका, अशा सूचना दिल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली.