‘तू माझी नाही तर, कुणाचीही होऊ देणार नाही, मी मरेन अन..; एकतर्फी प्रेमातून..

आजकालची तरुणाई प्रेमातून गुन्हेगारीकडे वळती झाली आहे. देशाला हादरवणारे श्रद्धा हत्याकांड असो किंवा औरंगाबाद विद्यापीठातील जळीत हत्याकांड असो यावरून हे स्पष्ट होते. असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यात अल्पवयीन मुलीला तरुणाने ‘तू माझी नाही तर कोणाचीच नाहीस, मी मरेन आणि तुलाही मारीन’, असे धमकी देत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार वाळूज औद्योगिक परिसरातील वडगाव कोल्हाटी येथील परिसरात घडला. घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली असून महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी तरुणाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शिवा साळुंके कोल्हाटी, वाळूज) असे संशियाताचे नाव आहे. 

घटनेची अधिक माहिती अशी की, 24 नोव्हेंबर रोजीवाळूज शहरातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या परिचयाचा शिवा हा मुलगा पिडीत मुलीच्या घराजवळ येऊन माझ्यासोबत रिलेशनमध्ये ये; असे म्हणत त्याने बोलण्याचा प्रयत्न केला. त्याला नकार देताच त्याने मुलीचा हात पकडून वाईट उद्देशाने जवळ ओढले. यानंतर तू माझी नाही तर कुणाची नाही. असे म्हणत वाईट कृत्य केले.

मुलीने आरडाओरड केली असता तो तेथून पळून गेला. त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी 25 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास मुलगी  ही कॉलेजमध्ये निघाली. कॉलेजमध्ये जात असताना पाठीमागून आलेल्या शिवाने तिला रस्त्यात गाठत अडवले. तसेच आज मी मरणार असून, तुलाही मारणार असल्याची धमकी देऊन तो तेथून निघून गेला. त्यामुळे घाबरलेल्या मुलीनी आई-वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर या प्रकरणी मुलीने  दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शिवा साळुंके याच्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, मुलींसोबत असे गैरप्रकार वाढले असून राज्यभर देशभर हेच स्थिती आहे. नाशकात देखील आधार आश्रमातील निराधार मुलींसोबत या वसतिगृहाच्या संचालकानेच बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या वसतिगृहातील एकूण १३ मुलींपैकी एकूण 6 मुलींवर या नराधम संचालकाने बलात्कार केल्याचे पोलीस तपासात उघडकीस झाले आहे.