नाशिक: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिक दौऱ्यादरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना थेट आव्हान दिलं होतं. हेमंत गोडसे यांनी पुन्हा लोकसभेला निवडून येऊन दाखवावं असं संजय राऊत म्हणाले होते. दरम्यान आज खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांना प्रतिआव्हान केलं आहे. संजय राऊत यांनी नाशिकमध्ये येऊन निवडणूक लढवून दाखवावी, हिम्मत असेल तर माझ्या समोर येऊन निवडणूक लढा असं चॅलेंजचं एकप्रकारे गोडसे यांनी संजय राऊत यांना दिले आहे.
नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ‘गोडसे शिंदे गटात गेले, नाशिकला लोकसभेचा चेहरा कोण’ असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘हेमंत गोडसे हे काय चेहरा आहेत का? शिवसेनेत चेहरा वगैरे काही नाही. शिवसेना हाच चेहरा आणि शिवसैनिक हीच आमची ताकद आहे. शिवसैनिकच आमदार-खासदार निवडून देतात आणि ते आमच्यासोबत असल्याने आम्हाला चिंता नाही.
दरम्यान संजय राऊत यांच्या या वक्तव्याचे स्पष्टीकरण देत गोडसे यांनी राऊतांवर चांगलाच निशाना साधला, ‘ते म्हणतात त्यांचा चेहरा नाही तर शिवसेनेचा चेहरा आमची ताकद आहे. मात्र चेहरा नाही तर काम महत्वाचं असतं. राऊत यांनी कधी उद्योजक आणि शेतकऱ्यांची बैठक घेतली का ?या माणसाने संपूर्ण शिवसेनेचे वाटोळे केले…..एकट्या माणसामुळे शिवसेनेची विल्हेवाट लागली…..उद्धाव आदित्य ठाकरे यांचा विश्वासघात करण्याचं काम राऊत करतात…..त्यांच्या चेहऱ्यामुळे राजकारणाची प्रतिमा मलिन होत आहे. असा घणाघात गोडसे यांनी केला. तर संजय राऊत यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतली असल्याचेही ते म्हणाले.
लोकसभा खासदार हेमतं गोडसे यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांनी ओपन चॅलेंजही दिलं होतं. “नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी पुन्हा लोकसभेत निवडून येऊन दाखवावं. त्यांचे राजकीय करिअर संपले आहे. खासदार गोडसे हे तिकडे गेल्यानतंर तर प्यारे झाले आहेत. आता त्यांची राजकीय कारकिर्द संपुष्टात आलीय. आता त्यांनी स्वत:ची कबर खोदली आहे.” असं राऊत म्हणाले. तर राऊत यांच्या या चॅलेंजच्या बदल्यात हेमंत गोडसे यांनीही एक चॅलेंज केले आहे. संजय राऊत यांनी नाशिकमध्ये येऊन निवडणूक लढवून दाखवावी आणि हिम्मत असेल तर माझ्या समोर येऊन निवडणूक लढा..’ असं गोडसे म्हणाले आहे.