नाशिक । प्रतिनिधी
अंजनेरी ट्रेकिंग इन्स्टीट्यूट (Anjneri Trekking Institute), गंगापूर येथील साहसी क्रीडा संकुल, गोवर्धन चे कलाग्राम (Kalagram), पिंप्री सैय्यद चे कृषी टर्मिनल (Farm Terminal), नाशिक विमानतळावरील पर्यटन सुविधा केंद्र, भावली डॅम परिसरात (Bhavli Dam) आदिवासी क्रिडा प्रबोधिनी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Fule Pune University) उपकेंद्रात प्राथमिक सुविधा विकसित करणे, मुंढेगाव चित्रपट सृष्टी फेरप्रस्ताव, लासलगाव सोळागाव पाणी पुरवठा योजना व मांगीतुंगी (Mangitungi) येथे होणाऱ्या महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी शासकीय सेवा सुविधांसह जिल्ह्यातील पर्यटन, क्रीडा, शिक्षण व मुलभूत सेवा-सुविधांच्या विकास कामांना गती देण्याच्या सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी दिल्या आहेत.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मुंढेगाव येथील दादासाहेब फाळके (Dadasaheb Falke) चित्रपट सृष्टीच्या निर्मीतीसाठी इगतपुरी (Igatpuri) हे अतिशय उत्तम व सुयोग्य असे ठिकाण आहे. तसेच ते मुंबई-पुणे या शहरांना लागून असल्याने मुंबईच्या चित्रपट सृष्टीला जोडणे सोयीचे होणार आहे. त्याचप्रमाणे येथील स्थानिकांना रोजगार मिळून लहान मोठे उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे.
त्यामुळे चित्रपट महामंडळाच्या मदतीने चित्रपट सृष्टीचा प्रकल्प अहवाल तयार करून शासनास सादर करण्यात यावा. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुंढेगावात भेट देवून तेथील ग्रामस्थांशी चर्चा करावी, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
आदिवासी भागातील मुले (Tribal Area) ही काटक शरीरयष्टीची असतात, त्यांना योग्य प्रशिक्षण मिळणे आवश्यक असते. त्यामुळे आदिवासी विभागाच्या बांधकाम विभागामार्फत या क्रीडा प्रबोधिनीसाठी (Sport Academy) नव्याने प्रस्ताव तयार करण्यात यावा, आणि यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र (Nashik Sub Center) परिसरातील रस्ते, पाणी पुरवठा व वीज या मुलभूत सुविधांची कामे पूर्ण करण्यात येवून या केंद्राच्या कामाचे भूमीपुजन करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे, अशा सूचना पालनकमंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत.