माथाडी कामगार संपाचा इम्पॅक्ट; जिल्ह्यातील बाजार समित्या ठप्प

नाशिक : आज माथाडी कामगारांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. नाशिकमध्ये देखील माथाडी कामगार संपाचा परिणाम दिसून आला आहे. नाशिक जिल्ह्यातील १७ बाजार समित्या बंद असून ५ हजार माथाडी कामगार आज संपावर आहे. त्यामुळे कांदा आणि भाजीपाला लिलाव आज बंद असेल.

आपल्या विविध मागण्यांसाठी माथाडी कामगार संघटनेने एक दिवसीय लक्षणीय संप पुकारला आहे. प्रलंबित प्रश्नांसाठी कामगारांनी कडेकोट बंद पुकारला असून नाशिकमध्ये देखील याचे परिणाम दिसून झाले. नाशकात १७ बाजारसमित्या बंद आहेत. नाशिक जिल्ह्यात रोज अंदाजे १ लाख क्विंटल कांद्याचा लिलाव होतो. मात्र आज सुरु असलेल्या कामगारांच्या या संपामुळे लिलाव देखील ठप्प आहे. यामुळे आज सकाळ पासूनच बाजारातील व्यवहार हे थंडावले आहेत.

नाशिकमधील १७ मार्केट बंद असल्याने याचा परिणाम भाजीपल्याच्या पुरवठ्यावर होणार आहे. त्यामुळे भाजीपाला महागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगारांचे काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रश्नांसाठी माथाडी कामगारांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. दरम्यान आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा कामगारांनी दिला आहे.

महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आणि संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील माथाडी कामगारांनी संपाची हाक दिली होती. त्यानुसार आज लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे.

माथाडी कामगारांच्या मागण्या

माथाडी कामगारांनी त्यांच्या काही मागण्यांसाठी हा बंद पुकारला आहे. त्यानुसार माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करुन त्यावर कामगारांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधींची सदस्य म्हणून नेमणूक करावी, विविध माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करुन त्यावर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात सदस्यांच्या नेमणुका करण्यात याव्या, विविध माथाडी मंडळातील कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य दिले जावे, माथाडी कायदा व विविध माथाडी मंडळांच्या योजनेतील त्रुटी दूर करण्यासंबंधी विशेष समिती गठीत करण्यात यावी, विविध रेल्वे यार्डात माथाडी कामगार व अन्य घटकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात, माथाडी कामगारांच्या कामात अडथळा आणून कामगारांवर दहशत करणा-या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा घालण्यासाठी संबंधितांची समिती गठीत करण्यात यावी. बाजार समितीच्या मापाडी/तोलणार कामगारांना बाजार समितीच्या कार्यालयीन सेवेत घेण्यात यावे, सिडकोमार्फत माथाडी कामगारांना नवीमुंबई परिसरात तयार घरे दिले जावे इत्यादी मागण्यांचा यात समावेश आहे.