इम्तियाज जलील यांनी ‘जलील भाषा’ करू नये : रामदास आठवले

नाशिक : औरंगाबाद आणि उस्मानाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव झाल्यानंतर अनेकांनी या निर्णयाचे स्वागत आणि जल्लोष केला मात्र एमआयएमने या नामांतराला विरोध केला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी हा निर्णय अमान्य करत या निर्णयाविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. एमआयएमचे नेते असदुद्दीन औवैसीही प्रचंड भडकले. त्यांनी ही तर हुकूमशाही आहे,’ अशी टीका केली. अशात इम्तियाज जलील यांच्या विरोधावर बोलताना ‘ते जलील नही खलील होना चाहीए’ अशी टीका आठवले यांनी केली आहे. ‘आमदार इम्तियात जलील यांनी जलील भाषा करू नये, जलील नही खलील होना चाहीए’ असे ते म्हणाले.

रामदास आठवले नाशिकमध्ये (Ramdas Athavale in Nashik) पत्रकारांसोबत बोलत होते. पुढे बोलताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांची कटपुतली नाही. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची आहे. या शब्दांत रामदास आठवले यांनी एकनाथ शिंदे यांचे समर्थन केले आहे.

एकनाथ शिंदे आणि भाजप सरकार आहे. त्यामुळे रिपब्लिकन पार्टीला ते जागा देतील आणि आमच्या येथे जागा निवडून येतील असा विश्वास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. यावेळी आरपीआयचा सिम्बॉल मिळविण्याचा प्रयत्न सुरु असल्याची देखील माहिती त्यांनी दिली.

काय म्हणाले रामदास आठवले..

आरपीआयचा सिम्बॉल मिळविण्याचा प्रयत्न सुरू असून आमचा कुठलाही कार्यकर्ता कमळाच्या चिन्हावर जरी लढला, तरी तो आरपीआयचा राहील. भाजपमध्ये सामील किंवा विलीन होणार नाही. नॉर्थ इस्ट भारतात आमचा पक्ष मजबूत होत आहे’ असेही रामदास आठवले यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र सरकारने औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला होता. राज्य सरकारने पाठविलेल्या प्रस्तावास केंद्र सरकारने औरंगाबाद आणी उस्मानाबादच्या नामांतराला मंजुरी दिली असून आता औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर मध्ये तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यात आले आहे. यावर बोलताना ‘नाव बदलून शहराचा विकास होत नसतो’, असे ते म्हणाले. ‘औरंगाबादचा विकास होत आहे, पण उस्मानाबाद ड्राय झोन आहे. त्यामुळे केवळ नाव बदलून विकास होणार नाही. मात्र उस्मानाबादचा विकास करण्याचा सरकारचा प्रयत्न असून मोदी सरकार विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे’ असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.