नाशिक: सरासरीने हजार ते दीड हजार रुपये येणारे वीज बिल ग्राहकांना जुलै महिन्यात पाच ते सहा हजार आल्याने ग्राहकांना चारशे चार व्होल्ट चा शॉकच बसला आहे. वीज ग्राहकांना जुलै महिन्याच्या बिलांमध्ये मीटर रीडिंग आणि बिलाच्या रकमेत फरक दिसून येत आहे. तशी तक्रार आणि दुरुस्तीसाठी ग्राहक वीज कार्यालयात गेले असता त्यांना आधी बिल भरा नंतर दुरुस्ती करू असा अजब दिला जात असल्याने ग्राहक संतप्त झाले आहे.
शहरात असे अनेक प्रकरणे उघडकीस आले आहेत. त्यात भद्रकाली, इंदिरानगर व द्वारका भागातील अनेक ग्राहकांना वीज मीटर रिडींगपेक्षा जास्त वीजबिल आलेले आहे.सबडिव्हीजन ऑफिस मध्ये अश्या प्रकरणाच्या अनेक तक्रारी येत असून या बिलांची दुरुस्ती होणे अपेक्षित असताना या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात आहे.शहरातील जुनी तांबट लेन येथील गाडगे महाराज पतसंस्थेत दर महिन्याला साधारणतः दिडशे युनिट पर्यंत विजेचा वापर होत असतो,मात्र पदाधिकाऱ्यांनी युनिटसंदर्भात माहिती घेतली असता महावितरणकडून ३०० युनिट जास्त लावण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
याप्रकरणी महावितरणचे मुख्य अभियंता यांनी दखल घेतली असून त्यांनी या संदर्भात उपअभियंत्यांना सूचना दिल्या आहेत. त्यांनी ग्राहकांनी वीजबिल आधी दुरुस्त करा मगच भरा असे सांगितले आहे. तफावत दुरुस्तीला वेळ लागला आणि बिल भरण्याची मुदत गेली तर ग्राहकांनी विलंब आकार भरण्याची गरज नाही. फक्त अश्या ग्राहकांना वीज वितरण कार्यालयात अर्ज द्यावा लागेल.