‘पठाण’ च्या पार्श्वभूमीवर नाशकात चित्रपटगृहांना छावणीचे स्वरूप..

by : ऋतिक गणकवार

नाशिक : प्रचंड वादाच्या भोवऱ्यात अडकलेला शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट अखेर आज बुधवारी देशभरात 5 हजार 200 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. असून नाशिकमध्ये देखील चित्रपट गृहात याचे शो हाऊसफुल्ल झाले आहेत. हिंदू संघटनांनी याला दर्शवलेला विरोध पाहता नाशकात पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. नाशिक पोलीस चित्रपटगृहांच्या बाहेरच तैनात असून चित्रपटगृहांना छावणीचे स्वरूप आले आहे असे चित्र सध्या नाशकात आहे. मात्र या चित्रपटाचे चाहत्यांना वेड लागले असून दूरवरचा प्रवास करून चाहते कडकत्या थंडीत सकाळी ७ च्या ‘शो’ ला हजर राहिले आहेत.

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोन यांचा ‘पठाण’ हा चित्रपट सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. याची सुरुवात चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळेच झाली. देशभर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्याकडून या गाण्याला आणि चित्रपटला कडाडून विरोध केला जात होता. अनेक ठिकाणी या संघटनाच्या कार्यकर्त्यांकडून राडा देखील करण्यात आला होता.

तसेच नाशिकच्या चित्रपटगृहाच्या बाहेर देखील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्याकडून कडाडून विरोध केला गेला होता. त्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी सकळी कडाक्याच्या थंडीत चित्रपटगृह आणि त्यांतील प्रेक्षकांना सुरक्षा दिली आहे. चित्रपटाची तुफान ओपनिंग झाली असून हा चित्रपट नक्कीच रेकॉर्ड ब्रेक ठरणार असल्याचे चित्र आहे.

या चित्रपटाची वाट अनेक चाहते करत असून शाहरुख खान पुन्हा एकदा कमबॅक दमदार करणार असल्याचा विश्वास त्याच्या चाहत्यांना होता. त्याच्या या नवीन भूमिकेची त्याच्या चाहत्यांना जणू काही भुरळच पडलीय असे म्हणू शकतो. कारण मालेगावमध्ये सर्व शो बुक झाल्याने एवढा दूरवरचा प्रवास करून तिकडचे काही चाहते नाशिक शहरात चित्रपट पाहण्यासाठी दाखल झालेय.

इथे सुरु आहे राडा

काही ठिकाणी या चित्रपटाला पाठिंबा मिळत आहे, तर कुठे विरोध होत आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये हिंदू संघटनांच्या निषेधामुळे पहिला शो रद्द करण्यात आला आहे. बिहार आणि यूपीमध्ये अनेक ठिकाणी पठाण चित्रपटाचे पोस्टर्स फाडण्यात आले.