नाशिक: शहर परिसरात घरफोडीच्या दोन घटना समोर आल्या आहेत. घरफोडीच्या या दोन्ही घटनांमध्ये सुमारे २० लाख किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचे चित्र दिसून येत आहे.
घरफोडीच्या पहिल्या घटनेची नोंद उपनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तक्रारदार संजय ईश्वरलाल बोरा (वय ५४ वर्ष) यांनी केलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांनी संजय बोरा (Sanjay Bora) यांच्या राहत्या बंगल्याचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. बंगल्यात प्रवेश केल्यानंतर बंगल्यात असलेल्या लाकडी कपाटातील लोखंडी तिजोरीतून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १७ लाख ७५ हजारांचा ऐवज चोरुन नेला आहे. यामध्ये ९० हजार रूपये किमतीचे ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले असे पाच जोडी झुमके, बारा लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र आणि हिरे जडीत हार, ४५ हजार किमतीच्या ३ सोन्याच्या आणि २ हिरे जडीत अंगठ्या, १ लाख ५ हजार किमतीच्या ४ सोन्याच्या चैन, ३० हजार रुपये किमतीचे ७ सोन्याचे कॉइन, ५ हजार रूपये किमतीचे चांदीचे पायल आणि ३ लाख रूपये रोख रक्कम असा चोरी गेलेल्या ऐवजाचा समावेश आहे. या घटनेतील चोरटे अद्याप पोलिसांच्या ताब्यात आले नसून चोरट्यांचा तपास उपनगर पोलिसांकडून सुरू आहे.
घरफोडीच्या दुसर्या घटनेची नोंद भद्रकाली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेत अज्ञात चोरट्यांनी भास्कर आनंदा झोंबाड ( वय ४२ वर्ष, रा. कोळीवाडा, अंबडगाव, नाशिक) यांच्या दुकानाचे शटर उचकवून दुकानात प्रवेश केला. भास्कर झोंबाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञातांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकवून दुकानात असलेला १ लाख २० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. यात ९४ हजारच्या रोख रकमेसह २८ हजार रोकड असलेल्या स्टीलच्या गल्ल्याचा समावेश आहे. या घटनेतील आरोपी देखील आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आले नसून प्रकरणाचा पुढील तपास भद्रकाली पोलीस करत आहेत.
शहरात झालेल्या घरफोडीच्या या घटना पाहता शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारी सत्र सुरु झाले आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. घरफोडीच्या या घटना पाहता शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान या दोन्ही घटनांमधील चोरट्यांना पकडण्याच आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालं आहे.