By चैतन्य गायकवाड |
शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shivsena leader and Minister Eknath Shinde) यांच्या बंडाने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार (MVA government) संकटात आल्याची चिन्हे आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे जवळपास ३९ तसेच काही अपक्ष आमदार देखील आहे. या बंडखोर आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचे पत्र राज्यपालांना दिले आहे. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. यासाठी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले असून, उद्या ३० जून रोजी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले असून, सरकार पडणार अशी चर्चा रंगली आहे. जर एकनाथ शिंदे यांच्या गटाचा पाठींबा भाजपला मिळाला तर, भाजप राज्यपालांना पत्र पाठवून सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. अशातच आता महाविकास आघाडी सरकारला सभागृहात बहुमताचा आकडा सिद्ध करावा लागेल. त्यासाठी फ्लोअर टेस्ट (floor test) अर्थातच बहुमत चाचणी घेतली जाईल. चला जाऊन घेऊया, बहुमत चाचणी म्हणजे काय?
बहुमत चाचणी म्हणजे काय..
केंद्रातील पंतप्रधान (PM) किंवा राज्यातील मुख्यमंत्री (CM) यांच्या सरकारकडे आवश्यक बहुमत आहे की नाही हे बहुमत चाचणीद्वारे ठरवले जाते. राज्य सरकारसाठी विधानसभेत निवडून आलेले आमदार (MLAs) आणि केंद्र सरकारसाठी लोकसभेतील खासदार (MPs) यांच्या मताद्वारे सरकारचे भवितव्य ठरत असते. राज्याचा विषय असेल तर विधानसभेत (legislative assembly), केंद्राचा विषय असेल तर लोकसभेत (loksabha) फ्लोअर टेस्ट अर्थातच बहुमत चाचणी केली जाते. फ्लोअर टेस्ट ही पारदर्शक प्रक्रिया असून त्यात राज्यपालांचा कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप होत नाही. फ्लोअर टेस्टमध्ये आमदार किंवा खासदारांना प्रत्यक्ष हजर राहून सर्वांसमोर मतदान करावे लागते.
बहुमत चाचणी केव्हा केली जाते..
जेव्हा एखाद्या सरकारच्या बहुमतावर प्रश्नचिन्ह लावले जाते किंवा सरकारकडे बहुमत आहे की नाही यावर शंका निर्माण होते, तेव्हा त्या सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागते. बहुमताचा दावा करणाऱ्या पक्षाच्या किंवा आघाडीच्या नेत्याला म्हणजेच मुख्यमंत्र्याला सभागृहात उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांमधून बहुमत सिद्ध करावे लागले.
जर मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करता आले नाही, तर त्यांना राजीनामा द्यावा लागतो. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय सत्ता संघर्षात उद्या उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करता आले नाही, तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल. २८८ सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत बहुमतासाठी १४४ सदस्यांची गरज आहे. शिवसेनेत बंडखोरी होण्याअगोदर शिवसेनेकडे ५५, राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५३ तर काँग्रेसकडे ४४ आमदार आहेत. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या दाव्यानुसार त्यांच्या गटात शिवसेनेचे जवळपास ३९ आमदार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांची संख्या १६ पर्यंत घसरली आहे. याचा अर्थ महाविकास आघाडीकडे बहुमत नाही, असा होतो.
बहुमत चाचणी घेण्याचा अधिकार कुणाला..
बहुमत चाचणी घेण्याचा अधिकार विधानसभेचे अध्यक्ष (speaker of legislative assembly) यांना असतो. यामध्ये त्या राज्याचे राज्यपाल (governer) कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करू शकत नाहीत. राज्यपाल फक्त बहुमत चाचणी करण्याचे आदेश देतात. बहुमत चाचणी पूर्ण करण्याची संपूर्ण जबाबदारी अध्यक्षांची आहे. जर एखाद्या वेळी अध्यक्ष निवडलेले नसतील, तर प्रथम हंगामी अध्यक्षांची नियुक्ती केली जाते. हंगामी अध्यक्ष (protem speaker) हे तात्पुरत्या कालावधीसाठी असतात. जेव्हा नवीन विधानसभा किंवा लोकसभा निवडली जाते, तेव्हा एका प्रो-टेम स्पीकरची निवड केली जाते, जे सभागृहाच्या सदस्यांना शपथ देतात.
बहुमत चाचणीसाठी मतदान कसे होते..
या बहुमत चाचणीसाठी आमदार आणि खासदार यांच्यासाठी मतदानासाठी वेगवेगळी पद्धत वापरली जाते. यात आवाजी पद्धतीने, हात उंचावून किंवा गुप्त मतदान पद्धतीने देखील मतदान घेतले जाऊ शकते. गुप्त मतदान पद्धतीत मतपत्रिकेचा वापर केला जातो.