दुचाकीसमोर अचानक कुत्रा आडवा आल्याने निष्पाप चिमुकलीचा मृत्यू

नाशिक : रस्त्यात कुत्रा आडवा आल्यामुळे अपघात होऊन एका चिमुकलीला आपले प्राण गमवावे लागले आहे. दुचाकी समोर अचानक कुत्रा आडवा आल्याने दुचाकी अपघातग्रस्त झाली. आणि या अपघातात दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. नांदूरनाका ते जत्रा हॉटेल रस्त्यावरील अपघाताची (Accidents on Nandoornaka to Jatra Hotel road) ही दुर्दैवी घटना आहे. या घटनेने शहर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दिव्यांश्री घुमरे (दोन वर्ष) असे मृत झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. कोणार्कनगर येथील प्रज्ञा सोसायटीत वास्तव्यास असणारी दिव्यांश्री आई दिपालीसोबत दुचाकीवरून जात होती. नांदुर नाका ते जत्रा हॉटेल मार्गावरील बांम्बूज हॉटेलसमोर जात असताना त्यांच्या दुचाकीला कुत्रा आडवा आला. अचानक कुत्रा समोर आल्याने आईला अकस्मात दुचाकीचा ब्रेक दाबावा लागला. पण वाहन नियंत्रित झाले नाही आणि हा अपघात झाला. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आई आणि चिमुकली कुत्रा समोरून आल्यामुळे (The dog suddenly came in front of the two wheeler causing an accident) दुचाकीवरून पडल्या. त्यात दिव्यांश्रीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच मामा ज्ञानेश्वर तागटे यांनी तातडीने तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान चिमुकलीचा मृत्यू झाला. तिला डॉक्टरांनी मृत घोषित करताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.

नाशिकमध्ये घडलेल्या य घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. अचानक दुचाकीला कुत्रा आडवा आल्याने चिमुकलीला नाहक आपला जीव गमवावा लागला. अपघातात मायलेकी दीपाली आणि दिव्यांश्री या दोघींनाही जबर मार लागला होता. मात्र दिव्यांश्रीच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिची स्थिती गंभीर झाली होती. जखमी अवस्थेत आपल्या मुलीला पाहून दीपाली घाबरल्या. त्यांनी तात्काळ आपल्या भावाला कॉल करून बोलावले. रस्त्यावरील वाहनचालकाच्या मदतीने जवळच असलेल्या दवाखान्यात चिमुकलीला दाखल करण्यात आले. तोपर्यंत चिमुकली बेशुद्ध अवस्थेत गेली होती. दवाखान्यात तात्काळ तिच्यावर उपचार सुरु केले मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेमुळे पुन्हा एकदा नाशिकच्या विविध भागात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा प्रश्न उपस्थित झाला आहे. निष्पाप जीवाचा बळी गेल्याने मनपाने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे अथवा अजूनही यासारख्या घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे.