By Pranita Borse
अमरावतीतील (Amaravati) मेडिकल व्यावसायिकाच्या हत्येमागे दहशतवादी संघटनेचा (Terrorist Organization) हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अमरावतीत मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी गळा चिरून हत्या करण्यात आली होती. हत्येच्या या घटनेनंतर अमरावतीत आणि महाराष्ट्रात देखील खळबळ निर्माण झाली होती.
कोल्हे यांची हत्या ज्या पद्धतीने करण्यात आली आहे, ते पाहता हल्लेखोरांचे धागेदोरे दहशतवादी संघटनेची असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, कोल्हे यांच्या खून प्रकरणातील सात आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सर्व आरोपींना मुंबईच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर न्यायालयाने सातही आरोपींना १५ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली आहे. त्यांच्या या हत्येमागे दहशतवादी संघटनांचा हात आहे की नाही, याचा तपास सुरू आहे.
नुपूर शर्माच्या वादग्रस्त वक्तव्याला समर्थन केल्याने कोल्हेंचा खून ?
नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल जे वादग्रस्त विधान केलं होतं. त्याला समर्थन केल्यामुळे राजस्थानच्या (Rajasthan) उदयपूर (Udaipur) येथे हत्याकांडाची घटना झाली होती. तशाच पद्धतीने नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानाला समर्थन केल्यामुळे अमरावतीत कोल्हे यांची हत्या केल्याचा आरोप भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केला होता.
नुपूर शर्मा यांनी मुस्लिम धर्माचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याचे पडसाद जगभरात उमटले होते. जगभरातील मुस्लिम देशांनी या वक्तव्याचा निषेध केला होता. कतार, कुवेत, इराण या देशांसह इस्लामिक कोऑपरेशन या आंतरराष्ट्रीय संघटनेनं यावर जोरदार आक्षेप घेतला होता आणि त्यांच्या देशातील भारतीय राजदूतांना बोलावून घेत आपला निषेध व्यक्त केला होता. मात्र, त्यानंतर राजस्थानच्या उदयपूरमध्ये जी घटना घडली तिने फक्त भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला देखील हादरून सोडलं. राजस्थानात नुपूर शर्माच्या वक्तव्याला समर्थन केल्यामुळे कन्हैयालाल नावाच्या व्यावसायिकाची चाकूने वार करत भरदिवसा निर्दयीपणे हत्या झाली. हत्या करणाऱ्यांनी हत्येचा व्हिडीओ काढला आणि हत्येची कबुली केल्याचा व्हिडीओ देखील समाज माध्यमांवर पोस्ट केला होता. तशाच प्रकारे अमरावतीत नुपूर शर्माच्या वादग्रस्त वक्तव्याला समर्थन केल्यामुळेच कोल्हेंची हत्या झाल्याचा दावा समोर आला होता.