उसनवारीचे घेतलेले पैसे नेहेमी चार-चौघात मागायचा हा अपमान सहन न झाल्याने तिघांनी मिळून एकाची लोखंडी हातोडी व दगडाने वार करून निर्घृण हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील औराळा येथे घडली आहे. या घटनेने औरंगाबाद हादरले असून सर्वत्र खळबळ उडाली आहे. सागर संतोष जैस्वाल (वय. २१ ) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघा संशयिताना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० नोव्हेंबरपासून सागर जैस्वाल हा बेपत्ता होता. त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र पोलिसांना त्याचा सुगावा लागला नाही. दरम्यान १ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पेडकवाडी शिवारातील पेडकवाडी घाटात म्हसोबा देवस्थानाजवळील पुलाच्या पाईपमध्ये एक मृतदेह साडी व प्लास्टीकच्या कव्हरमध्ये गुंडाळून टाकलेल्या अवस्थेत आढळून होता. मृतदेहाची तपासणी करता हा मृतदेह सागरचा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी घटनेचा तपास जलदगतीने करत प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढली आणि याच्या सूत्रधारांना अटक केली.
संशयितांनी खुनाची कबुली दिली
मयत सागर जैस्वाल याच्याकडून पंढरीनाथ वाघचौरे आणि दिनेश उर्फ पप्पु साळुंके यांनी उसने पैसे घेतलेले होते. मृत सागर जैस्वाल हा नेहमी त्यांच्याकडे चार चौघात उसनवारीने घेतलेल्या पैशांची मागणी करुन त्यांचा अपमान करीत होता. त्यामुळे पंढरीनाथ परसराम वाघचौरे , काकासाहेब परसराम वाघचौरे, दिनेश उर्फ पप्पु संताराम साळूंके यांनी सागर यास पैसे घेण्यासाठी पेडकवाडी शिवारात बोलाविले होते. तेथे त्यांनी त्याचा लोखंडी हातोडी व दगडाने डोक्यात मारुन त्याला कायमचे संपवले. त्यानंतर प्रेत पेडकवाडी घाटातील पाईपमध्ये टाकून दिले. तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन, हातातील अंगठया व कानातील बाळी काढून घेतली. त्यांनीच खून केल्याची कबुली दिली.