मंत्रिपद खड्ड्यात गेलं तरी चालेल..; महाराजांवरील आक्षेपार्ह विधानांवर गुलाबराव पाटील संतापले

राज्यात सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने होत आहेत. यावरून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील कमालीचे आक्रमक झाले आहेत. शिवरायांच्या बाबतीत कोणत्याही ‘मायच्या लाल’ला बोलण्याचा अधिकार नाही. मग कुणीही असो. राज्यपाल असो की राष्ट्रपती असो. छत्रपती हे देवांचे देव आहेत. मंत्रिपद खड्ड्यात गेलं तरी चालेल पण यांना सोडणार नाही असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.

राज्यात शिवाजी महाराजांबद्दल एकामागून एक वादग्रस्त वक्तव्ये करण्याची मालिकाच सुरु आहे. यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या जात आहे. छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाला असल्याचे वक्तव्य भाजप नेते प्रसाद लाड यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचा कडक शब्दांत समाचार घेतला आहे.

ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याचा अधिकार नाही. छत्रपती शिवरायांबद्दल कोणीही चुकीचे बोलत असेल, तर तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला माफ केलं जाणार नाही असे मंत्री गुलाबराव पाटील म्हटले. छत्रपती शिवरायांच्या नखाची बरोबरी हे नालायक करू शकत नाही,” अश्या शब्दांत शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.

“मंत्रिपद खड्ड्यात गेलं तरी चालेल पण यांना सोडणार नाही. महाराजांबद्दल चुकीचं बोलणारा तो कुणीही असो वा कुठल्याही पक्षाचा असो, चुकीला माफी नाही” असा इशारा त्यांनी दिला आहे.

प्रसाद लाड यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाला असल्याचे वक्तव्य भाजप नेते प्रसाद लाड यांनी केले त्यांनतर राज्यातील वातावरण तापले असून शिवप्रेमी पेटून उठले. त्यात विरोधी पक्षांनी प्रसाद लाडांसह भाजपवर हल्लाबोल केला. या सगळ्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी छत्रपती शिवराय हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहेत. अनावधानाने माझ्याकडून दुसरा शब्द प्रयोग झाला. परंतू त्वरित चूक दुरुस्त केली. पण कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करत असल्याचे प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.