भगवान ऋषभदेव यांच्या अभिषेक सोहळ्याने जैन कुंभमेळ्याला प्रारंभ..

By चैतन्य गायकवाड |

सटाणा (जि. नाशिक) : सटाणा (Satana) तालुक्यातील मांगीतुंगी (Mangitungi) येथील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्री भगवान ऋषभदेव (Bhagvan Rushabhdev) यांच्या महामस्तकाभिषेक सोहळ्यास बुधवारी प्रारंभ झाला. भगवान ऋषभदेव यांच्या जगप्रसिद्ध १०८ फूट उंच मूर्तीचा पहिला आंतरराष्ट्रीय महामस्तकाभिषेक सोहळ्यास मंत्रघोषाच्या सान्निध्यात मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला. या सोहळ्यानिमित्ताने जैन कुंभमेळ्याला देखील प्रारंभ झाला. या सोहळ्यासाठी देश-विदेशातून जैन बांधव उपस्थित झाले आहेत. या जैन बांधवांच्या उपस्थितीत जैन धर्मियांचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांचा गजर झाला आहे.

या सोहळ्याला बुधवारी सकाळी ८ वाजता मांगीतुंगी पर्वतावर उद्योजक कमल जैन ठोलिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रारंभ झाला. यावेळी भगवान ऋषभदेव यांच्या मूर्तीवर ड्रोनच्या (drone) सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी पहिल्या दिवशी भगवान ऋषभदेव यांचा महामस्तकाभिषेक करण्यात आला. १००८ लीटर पंचामृताने अभिषेक करण्यात आला. या पंचामृतात १००८ लीटर दुध त्याच्यात दही, केशर, सर्व औषधी, हरिद्रा, अष्टगंध यांचा समावेश करण्यात आला होता. हा महामस्तकाभिषेक करण्याचा प्रथम मान गाझियाबाद येथील जंबूप्रसाद जैन, विद्याप्रसाद जैन यांना मिळाला. तर द्वितीय मान सुरत येथील संजय दिवाण, अजय दिवाण यांना मिळाला. या कार्यक्रमास महामस्तकाभिषेक महोत्सव समितीचे महामंत्री संजय पापडीवाल, अनिलकुमार जैन, सी. आर. पाटील, प्रमोद कासलीवाल, भूषण कासलीवाल यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. तसेच पोलिस अधीक्षक सचिन पाटील (SP Sachin Patil), अप्पर पोलिस अधीक्षक (ASP) चंद्रकांत खांडवी (Chandrakant khandavi), उपविभागीय अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी या पोलिस अधिकाऱ्यांसह प्रशासनाचे अधिकारी आणि पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

सलग १५ दिवस चालणाऱ्या या सोहळ्यासाठी देश-दिदेशातील जैन भाविक उपस्थित झाले आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच भाविकांच्या प्रवासासाठी विशेष वाहनांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. तसेह बागलाण पंचायत समिती आरोग्य विभागामार्फत तात्पुरत्या स्वरुपात दवाखान्याची देखील सोय करण्यात आली आहे. याठिकाणी महिला व पुरुष रुग्णांची स्वतंत्र तपासणी साठी कक्ष तयार करण्यात आले आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभाग देखील मदतीसाठी कार्यरत आहे. तसेच भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिस कर्मचाऱ्यांचा देखील बंदोबस्त तैनात केलेला आहे.