By चैतन्य गायकवाड
टोकियो : जपान (Japan) येथे माजी पंतप्रधानांवर प्राणघातक हल्ला (attack on ex PM) केल्याची घटना घडली आहे. माजी पंतप्रधान शिंजो ॲबे (former PM Shinzo Abe) यांच्यावर प्राणघातक हल्लाची घटना घडली आहे. जपानमध्ये एका ठिकाणी भाषण सुरू असताना त्यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पश्चिम जपानमधील नारा (Nara) या शहरात ही घटना घडल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे. या घटनेत गोळी लागल्याने शिंजो ॲबे यांना रक्तस्त्राव झाला. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भात जपानमधील एका वृत्तसंस्थेने (news agency) माहिती दिली आहे.
दरम्यान, ही घटना शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास (भारतीय वेळेनुसार साडेआठ) वाजता घडली. शिंजो ॲबे हे नारा या शहरात भाषण करत असताना, त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर माजी पंतप्रधान स्टेजवर कोसळले. या घटनेत पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर शिंजो ॲबे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर पुढील उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती अस्थिर असल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे.
दरम्यान, शिंजो ॲबे यांच्यावर गोळीबार केल्याच्या घटनेनंतर काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत. माजी पंतप्रधानांवर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. तसेच भाषणासाठी उपस्थित नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण देखील पसरले. हा हल्ला कोणी केला आणि का केला, याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
जपानचे माजी पंतप्रधान
शिंजो ॲबे हे जपानचे माजी पंतप्रधान असून, त्यांनी ऑगस्ट २०२० मध्ये पंतप्रधान पदाचा राजीनामा (resigned as PM) दिला होता. प्रकृती अस्वस्थतेमुळे शिंजो ॲबे यांनी पंतप्रधान पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. शिंजो ॲबे हे दीर्घकाळ जपानचे पंतप्रधान पद भूषवणारे व्यक्ती ठरले होते. त्यांनी जपानच्या पंतप्रधान पदाची धुरा जवळपास आठ वर्षे सांभाळली. पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात ते भारत दौऱ्यावर देखील आले होते.