सीमावादावरून राज्यातच जुंपली! जोरदार हल्ले-प्रतिहल्ले

कर्नाटकात महाराष्ट्रातील वाहनांवरील झालेल्या हल्ल्यांमुळे कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद पुन्हा उफाळला आहेच मात्र यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. त्यांच्यात शाब्दिक हल्ले-प्रतिहल्ले सुरु झाले असून यामुळे भर थंडीत महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत तिखट शब्दांत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. त्यात मुख्यमंत्र्यांपासून-उपमुख्यमंत्र्यांचा त्यात समन्वयक दोन मंत्र्यांचा देखील त्यांनी समाचार घेतला. त्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून मंत्री आणि सीमावाद समन्वयक शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांना सडेतोड उत्त्तर देत त्यांच्यावर प्रतिहल्ला चढवला आहे. यामुळे एकूणच राज्यातील राजकीय वातावरण भर थंडीत तापले असून आणखी भडके उडण्याची शक्यता आहे.

संजय राऊतांचा जोरदार हल्ला

राऊत म्हणाले, “हे महाराष्ट्राच्या जमिनीचं रक्षण करण्यात अपयशी ठरलेत. या सरकारला एक दिवसही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, हे त्यांनी मान्य केलं पाहिजे. ज्या पद्धतीनं सीमाभागांत सरकारी प्रेरणेनं जे काही सुरु आहे. कर्नाटकात भाजपचं सरकार आहे. केंद्रात भाजपचं सरकार आहे.”

“मात्र तरीही केंद्र सरकारकडून सीमा प्रश्नी हस्तक्षेप का होत नाहीये? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राच्या आर्थिक नाड्या आवळल्या जात आहेत. त्यात आता कर्नाटक सरकार सोलापूर-सांगली या महाराष्ट्राच्या जागेवर दावा सांगत आहे.”

“महाराष्ट्राचे लचके सहजतेनं तोडता यावेत म्हणून शिवसेनेचं सरकार घालवलंय, अशाप्रकारची वेळ महाराष्ट्रावर कधीच आली नव्हती. इतके हतबल मुख्यमंत्री, इतके लाचार सरकार या महाराष्ट्रानं गेल्या 55 वर्षांत पाहिलेलं नाही. दोन मंत्र्यांनी काल शेपुट घातलं, जाणार होतो.”

“हे म्हणे मर्द आणि स्वाभिमानी. काय चाललंय या राज्यात. डरपोक सरकार! ज्यांना आपल्या महाराष्ट्रातील जनतेची काळजी नाही. महाराष्ट्राच्या सीमांची काळजी नाही, सीमा कुरतडल्या जातायत या राज्यांच्या. ज्या 105 हुतात्म्यांनी रक्ताचं पाणी करुन, बलिदान करुन हा महाराष्ट्र आणि मुंबई मिळवली आहे. कोणी याबाजुला कुरतडतंय, कुणी त्या बाजुनं कुरतडतंय. आणि हे सरकार षंडासारखं, नामर्दासारखं बसलेलं आहे. हो नामर्दच सरकार आहे.”, असं संजय राऊत म्हणाले. 

“कर्नाटकचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात घुसून दादागिरी करतो. तुम्ही तर स्वत:ला भाई समजणारे मुख्यमंत्री आहेत ना? मग दाखवा ना आता कर्नाटकाला भाईगिरी, कसले भाई तुम्ही” असं म्हणत संजय राऊतांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चॅलेंज केलं होतं.

मंत्री शंभूराज देसाई यांचा जोरदार प्रतिहल्ला

संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवल्याने शंभूराज देसाई हे आक्रमक होत संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. देसाई म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात वक्तव्य केल्यास आम्ही दोन हात करायला तयार आहोत, महाराष्ट्र-कर्नाटक वादावर आम्ही चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय. संजय राऊतांना सीमावादावर बोलण्याचा अधिकार नाही. राऊतांनी वादग्रस्त वक्तव्य थांबवावीत, अन्यथा त्यांना चोख उत्तर दिलं जाईल.”

“आताच तुम्ही साडेतीन महिन्यांचा आराम करुन तुरुगांबाहेर आला आहात. तुरुंगाबाहेरच वातावरण तुम्हाला मानवत नाही असं वाटतंय, म्हणून तुम्ही अशी वक्तव्य करताय. तुम्हाला पुन्हा आराम करण्याची वेळ येऊ नये. त्यामुळे तुम्ही अशी वक्तव्य करणं टाळावं.”

“शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत जे वक्तव्य केले त्याचा मी धिक्कार करतो. केंद्राने या विषयात लक्ष द्यावं, समन्वय साधावा यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. असं असताना राऊतांनी ‘षंड’ शब्द वापरला. संजय राऊत यांनी स्वतःलढ्यात उतरा आणि मग मुख्यमंत्र्यांबाबत बोला.”

“कर्नाटक न्याय व्यवस्थेकडे राऊतांना आमंत्रण आलं होतं. त्यावेळी ते गेले नाहीत. न्यायालयाचे कवच कुंडल असताना तुम्ही जाऊ शकला नाहीत मग संजय राऊतांना काय म्हणावं? असा सवाल देसाई यांनी उपस्थित केला आहे.”