कपिल सिब्बल ‘सायकल’वर स्वार; सपाकडून राज्यसभेसाठी अर्ज दाखल…

लखनऊ: काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते तसेच माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी कॉंग्रेस पक्षाला रामराम केला आहे. काँग्रेसच्या G-23 गटाचे भाग असलेले कपिल सिब्बल यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा (resignation) दिला असल्याची घोषणा केली आहे. काँग्रेसच्या नाराज गटाचे भाग असलेले कपिल सिब्बल गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेतृत्वावर विशेषतः राहुल गांधींवर (Rahul Gandhi) नाराज होते. त्यांनी राहुल गांधींवर प्रश्नही उपस्थित केले होते. त्यामुळे कपिल सिब्बल यांना काँग्रेस राज्यसभेवर पाठवणार नाही, अशी चर्चा होती. दरम्यान, कपिल सिब्बल यांनी समाजवादी पक्षाच्या (SP) पाठींब्यावर राज्यसभेसाठी (Rajya Sabha) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर कपिल सिब्बल म्हणाले की, त्यांनी १६ मे रोजीच काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सोपवला आहे.

समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh) राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली. समाजवादी पार्टीने कपिल सिब्बल यांना उमेदवारी जाहीर केली. दरम्यान, कपिल सिब्बल हे उत्तर प्रदेशमधून काँग्रेसच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार होते. मात्र, यावर्षी फेब्रुवारी-मार्च दरम्यान झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा (Legislative Assembly) निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे फक्त दोनच उमेदवार विजय मिळवू शकले होते. कपिल सिब्बल यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी पुरेसे आमदार काँग्रेसकडे नाहीत. त्यामुळे कपिल सिब्बल यांनी राज्यसभेवर निवडून येण्यासाठी इतर मार्गांची चाचपणी सुरु केली होती. आता समाजवादी पक्षाच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज दाखल करून सिब्बल यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे. दरम्यान, नामांकन (nomination) दाखल करण्यावेळी कपिल सिब्बल यांच्यासोबत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश (Akhilesh Yadav) यादवही सोबत होते.

कपिल सिब्बल हे प्रसिद्ध कायदेतज्ञ आहेत. कपिल सिब्बल यांनी अनके महत्वपूर्ण खटले सुप्रीम कोर्टात लढवले आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवण्यासाठी तीन मोठे पक्ष तयारीत होते. उत्तर प्रदेश मधून सपा, बिहारमधून राजद, झारखंड मधून झामुमो यांनीही तयारी दर्शवली होती. मात्र, कपिल सिब्बल यांनी समाजवादी पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये ११ जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.