उंदराला बुडवून मारले! गुन्हा दाखल, आरोपीला अटक

उत्तरप्रदेश : समाजात काही विकृती असतात जे मुक्या प्राण्यांना नाहक त्रास देतात. या त्रासातून कधी मुक्या प्राण्यांचा जीव देखील जातो. मात्र हे करणाऱ्याला कोणत्याही प्रकारची मनात खल नसते. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या बदायु येथे घडली आहे. एका तरुणाने उंदराला दोरीने बांधून नाल्यात बुडवून मारले. याप्रकरणी एका सामजिक कार्यकर्त्याने तक्रार दिली असून पोलिसांनी प्रकरणात प्राणी क्रुरता अधिनियमानुसार, गुन्हा दाखल केला आहे. संशयिताला अटक करण्यात आली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज कुमार हा उंदराला एका दोरीने बांधून नाल्यात डुबवत होता आणि बाहेर काढत होता. तरुण उंदराच्या जीवाशी खेळत होता. हा सर्व तेथीलच सामाजिक कार्यकर्ते विकेंद्र शर्मा यांनी पहिले यानंतर शर्मा यांनी मनोज कुमार याला सांगितले की असे करू नको. विरोध केल्यानंतरही मनोज कुमार थांबला नाही.

तो त्या उंदरासोबत तेच वारंवार करत होता. नाल्यात डुबवित होता, शर्मा यांनी उंदराला सोडण्याची पुन्हा विनंती केली. मात्र आरोपीने त्याकडे लक्ष न देता कहरच केला. आरोपीने एका फरशीच्या तुकड्याला बांधलेल्या उंदराला नाल्यात फेकून दिले. त्यामुळे हा उंदीर मृत झाला.

याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते विकेंद्र शर्मा यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला प्राणी क्रुरता अधिनियमानुसार, गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

उंदराचे पोस्टमार्टम करण्यात येणार

बरेली येथील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेत उंदराचे पोस्टमार्टम करण्यात येणार आहे. पोस्टमार्टमसाठी पोलिसांनी एसी टॅक्सीचे 1500 रुपये भाडेही दिले. तसेच शवविच्छेदनासाठी आवश्यक 225 रुपयांची पावती ही फाडली आहे. उंदराचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी त्याचे पोर्टमार्टम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याआधारे पोलिसांना आरोपीविरोधात पुरावा गोळा करता येणार आहे.