By चैतन्य गायकवाड |
मुंबई : राज्यात सध्या राज्यसभा (Rajyasabha) निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. ही निवडणूक १० जून रोजी होणार आहे. त्यातच आता 20 जून रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार घोषित करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाने (BJP) उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर, आता काँग्रेसकडूनही (Congress) आपले उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून भाई जगताप (Bhai Jagtap) आणि चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांच्या आदेशानुसार या दोघांच्या नावांना मान्यता दिली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस मुकूल वासनिक यांनी याबाबत परिपत्रक काढले आहे. काँग्रेसकडून मोहन जोशी, सचिन सावंत, अतुल लोंढे, सिद्धार्थ हत्ती अंबरे, हर्षवर्धन संकपाळ यांच्या नावांची चर्चा होती. अखेर सोनिया गांधी यांनी भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती मुकूल वासनिक यांनी दिली.
भाजपने ही जाहीर केले उमेदवार … भारतीय जनता पक्षाने (BJP) आपले पाच उमेदवार निश्चित केले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे (Uma Khapare), माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde), भाजपचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय (Shreekant Bhartiy) यांच्या नावावर भाजपने शिक्कामोर्तब केले आहे. या नावांबाबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. भाजपने जाहीर केलेल्या या यादीत अपेक्षेप्रमाणे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे प्रसाद लाड यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तसेच माजी मंत्री राम शिंदे आणि पंकजा मुंडे या दोन ओबीसी नेत्यांमध्ये राम शिंदे यांना संधी देऊन पंकजा मुंडे यांना डावलण्यात आले आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय आणि भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांना लॉटरी लागल्याचे दिसून येत आहे.
असा असेल विधानपरिषद निवडणूक कार्यक्रम …. विधानपरिषदेच्या या निवडणुकीसाठी निवडणूक अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक (last date) ९ जून २०२२ आहे. अर्जांची छाननी १० जुन रोजी होणार आहे. १३ जुन हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. 20 जून २०२२ रोजी मतदान होणार आहे. सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. त्याचदिवशी सायंकाळी ५.०० वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.