नाशिक | प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील मोहाडी परिसरात आढळून आलेल्या बिबट्याचा बछडा अखेर आईच्या कुशीत विसावला. या घटनेनंतर वनविभागाने सुटकेचा निश्वास सोडला.
दिंडोरीच्या मोहाडी परिसरात परिसरातील उसाच्या शेतात ऊसतोड कामगारांना ऊसतोडणी करताना बिबट्याचा बछडा आढळून आला होता.
त्यानंतर मादी बिबट्याने बछड्याला घेऊन जावे, यासाठी वन विभागाने बछड्याला देखरेखीखाली घटनास्थळी ठेवले होते. सायंकाळच्या सुमारास मादी बिबट्या बछड्याला घेऊन वनक्षेत्रात निघून गेल्याने वन विभागाचा जीव भांड्यात पडला.
ही सर्व घटना वनविभागाने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा क्षण सुखावणारा असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.