अयोध्या, वाराणसीच्या धर्तीवर नाशकात होणार गोदामाईची महाआरती

नाशिक : अयोध्या, वाराणसी आणि हरिद्वारच्या धर्तीवर आता गोदावरी नदीचीही रोज महाआरती होणार आहे. गंगा नदीची पवित्र नदी म्हणून ओळख आहे. या नदीला मोठं धार्मिक महत्त्व प्राप्त आहे. त्याचप्रमाणे गोदावरीला देखील दक्षिणगंगा म्हटलं जातं. गोदावरी नदीही गंगा नदीप्रमाणेच धार्मिक महत्त्व प्राप्त असलेली एक महत्त्वाची नदी आहे. त्यामुळेच आता गंगेप्रमाणे नाशिकच्या रामकुंड परिसरात रोज महाआरती होणार आहे. तर या महाआरतीसाठी सरकारकडून निधी मंजूर करण्यात आला आहे.

या महाआरतीसाठी सरकारकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच या संदर्भात आराखडा तयार करून आरतीला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आहे. महंत अनिकेत शास्त्री महाराज यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता. या आधी अनिकेत शास्त्री यांनी केंद्र सरकारकडे गोदावरी नदीवर महाआरतीची मागणी केली होती. केंद्र सरकारने याबाबतचे आदेश आदेश राज्य सरकारला दिले होते. त्यानंतर अनिकेत शास्त्री यांनी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी सकारात्मक निर्णय घेत गोदावरी नदीवर महाआरती करण्यासाठी निधी मंजूर केला आणि यासाठी आराखडा तयार करून आरतीला सुरुवात करण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिकच्या रामकुंडावर होणारी ही महाआरती अत्यंत महत्वाची असेल. रामकुंडावर भाविक भक्तांसह पर्यटकांचीही लगबग असते. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीनेही आरतीचा हा सोहळा महत्वाचा असणार आहे. अयोध्या, वाराणसी आणि हरिद्वारच्या धर्तीवर नाशिकमध्ये होणाऱ्या या महाआरतीमुळे गोदामाईचे महत्व आणखी वाढेल.

गंगा आरतीचे महत्व :

नद्यांमध्ये गंगा माता ही सर्वात पवित्र आणि पूजनीय नदी मानली जाते आणि यामुळेच गंगा नदीत स्नान करण्यासाठी दूरदूरवरून लोक येतात. असे मानले जाते की गंगा नदीत स्नान केल्याने सर्व दुःख आणि पाप धुऊन जातात. दरम्यान गंगा नदीत स्नान करण्याव्यतिरिक्त सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आरती. गंगा आरतीचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. गंगा आरतीचे दृश्य पाहून माणूस भक्तीच्या रसात भिनतो. गंगा आरती पाहण्यासाठी भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक येतात. पर्यटकांसाठीही ही आरती एक आकर्षणाचा विषय आहे. एवढेच नाही तर गंगा आरती भक्तीभावासह पर्यटकांसाठी पर्यटनाचा एक विशेष भाग आहे. असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कारण अनेक पर्यटक अयोध्या, वाराणसी आणि हरिद्वार या ठिकाणी खास गंगा आरती पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी हजेरी लावत असतात.