महाराष्ट्र विधानसभा बरखास्त होणार ? संजय राऊत यांचे सूचक ट्विट..

By चैतन्य गायकवाड |

मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. त्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे बंडखोर आमदार हे सुरतमधील एका हॉटेल मध्ये थांबल्याची माहिती आहे. त्यानंतर या सर्व आमदारांना सुरतवरून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आल्याची देखील माहिती मिळाली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आपल्याबरोबर जवळपास ४० आमदार असल्याचा दावा केला आहे. या आमदारांसोबत काही अपक्ष आमदार देखील असल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे हे सध्या या आमदारांसोबत आसाममधील गुवाहाटी येथील एका हॉटेलमध्ये थांबल्याची माहिती हाती येत आहे. राज्यातील या सर्व घडामोडींमुळे राज्य सरकार धोक्यात आल्याची सूचना मिळत आहे. कारण शिवेसेनेचे बहुतांश आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राज्य सरकार अल्पमतात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्य सरकार कोसळणार का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

दरम्यान, त्यातच आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. हे ट्विट राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे आहे. संजय राऊत यांनी म्हटले आहे की, ‘महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास आता विधानसभा बरखास्तीच्या दिशेने…’ या ट्विट मुळे राज्य सरकार कोसळणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार का, हे बघणे देखील महत्त्वाचे आहे.

एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवले.. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले बंड मागे घेण्यासाठी काही अटी घातल्या आहे. त्या अटींमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत सरकार नको. त्याऐवजी शिवसेनेने भाजपसोबत युती करून सत्ता स्थापन करावी. तसेच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद द्यावे, अश्या अटी घालण्यात आल्याची माहिती आहे. या घटनांमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यातच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरून हटवले आहे. तर आमदार अजय चौधरी यांना विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्त करण्यात आले आहे.