शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘भाजप हा पक्ष आहे की चोरबाजार?’ या खोचक सवालाला नारायण राणेंनी सडेतोड उत्तर दिलं आहे. बुलढाण्यात शेतकरी संवाद मेळाव्यात त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली होती. यावेळी टीका करताना उद्धव ठाकरेंनी ‘भाजप हा पक्ष आहे की चोरबाजार?’, असा सवाल केला होता. यावर बोलताना राणे यांनी “महाराष्ट्रात ८५ टक्के साक्षरता आहे पण, ती मातोश्रीमध्ये नाही. ” असा टोला लागावाला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी बुलढाण्यात शेतकरी संवाद मेळावा घेतला होता. या मेळाव्यात त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली होती. यावेळी टीका करताना उद्धव ठाकरेंनी ‘भाजप हा पक्ष आहे की चोरबाजार?’, असा खोचक सवाल केला होता. त्यांच्या याच टीकेला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
“महाराष्ट्रात 85 टक्के पेक्षा जास्त साक्षरता आहे पण, ती मातोश्रीमध्ये नाही. उद्धव ठाकरे यांचं बुलढाण्यातील भाषण माझ्याकडे आहे. म्हणे, भाजप हा पक्ष आहे की चोरबाजार? आता चोर म्हणत आहेत. त्यांच्याबरोबर अनेक वर्ष संसार केला ना? अनेक वर्ष सोबत होते ना? पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं नाव वापरुन मोठे झालात ना, भाजपचा हात धरुन सत्तेत आलात ना, आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसोबत अडीच वर्ष होते ना? तेव्हा नाही वाटले चोर?, तुम्ही अडीच वर्षात किती चोरी केली ते जरा सांगा. कोरोनाचे औषध खरेदीत किती केली. किती खोके, पेट्या औषधामध्ये गेल्या?”, असा सवाल करत राणेंनी ठाकरेंवर गंभीर आरोप केलाय. असे आरोप करत “माझ्याकडे कंपन्यांचा पुरावा आहे. मालक बोलायला तयार आहेत की, किती टक्के मागत होते. औषधांअभावी अनेक माणसं गेली. आणि हे टक्के मागत होते”, असा आरोप नारायण राणे यांनी केलाय.
प्रशासनाची ए.बी.सी.डी ठाकरेंना माहिती नाही. दरवर्षी अनेक गुंतवणुकीचे प्रस्ताव येतात. राज्यसरकार यावर विचार करतं. कोणता सोयीचा ? कोणता परवडणारा आहे असा. मात्र असे काही कायदे, नियम, प्रथा परंपरा उद्धवजींना माहित नाही. त्यांना फक्त एक माहितीये खुर्चीवर बस ते पण मंत्रालयाच्या नाही. मंत्रालयातील स्टाफ ने सांगितलं या खुर्चीवर उद्धव ठाकरे फक्त अडीच तास बसले. अशी देखील टीका राणे यांनी यावेळी केली.