By चैतन्य गायकवाड |
मुंबई : राज्यात सध्या राज्यसभेच्या (Rajyasabha) ६ जागांसाठी होणारी निवडणूक चर्चेत आहे. येत्या १० जून रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. त्यात कोण बाजी मारणार, हे १० जून रोजी कळेलच! त्यातच आता विधानपरिषदेच्या दहा रिक्त जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी चर्चा सुरु आहे. येत्या 20 जून रोजी ही निवडणूक होणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची (candidates) चाचपणी सुरु केली आहे. ह्या उमेदवारांना ९ जून पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळे राजकीय पक्ष लवकरच आपले उमेदवार जाहीर करतील.
विधान परिषदेसाठी या नेत्यांची चर्चा… दरम्यान, विधानसभा संख्याबळानुसार भाजपला (BJP) चार जागा निवडून आणता येईल अशी शक्यता आहे. या चारपैकी एका जागेवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. तर उर्वरित जागांसाठी देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती समजले जाणारे प्रसाद लाड (Prasad Lad) यांनाही पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde), चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचीही नवे चर्चेत आहे. तसेच सध्या कार्यकाळ संपत असलेले सदाभाऊ खोत आणि विनायक मेटे यांना पुन्हा संधी दिली जाणार का, हा प्रश्न आहे. पण या सर्व नावांमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळते का, हे पाहणं उत्सुकतेचे असेल.
शिवसेनेकडून संख्याबळानुसार २ जण विधानपरिषदेत जातील. त्यात उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या जागेसाठी सचिन अहिर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, कार्यकाळ संपत असलेले शिवसेना नेते दिवाकर रावते यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता धूसर आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचं तिकीट कन्फर्म मानलं जात आहे. तर दुसऱ्या जागेसाठी एकनाथ खडसे यांच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान, आता काँग्रेसकडून कुणाला संधी मिळणार, हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
असा असेल विधानपरिषद निवडणूक कार्यक्रम …. विधानपरिषदेच्या या निवडणुकीसाठी आयोगाकडून अधिसूचना दि. २ जुन, २०२२ रोजी जाहीर करण्यात येणार आहे. निवडणूक अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक (last date) ९ जून २०२२ आहे. अर्जांची छाननी १० जुन रोजी होणार आहे. १३ जुन हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. 20 जून २०२२ रोजी मतदान होणार आहे. सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. त्याचदिवशी सायंकाळी ५.०० वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.