मुंबई । प्रतिनिधी
मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या १ मे रोजी होणाऱ्या औरंगाबादमधील सभेला (Aurangabad sabha) अखेर परवानगी मिळाली आहे. गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी एकूण १६ अटी घालत राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली आहे. यामध्ये जातीय तेढ आणि धार्मिक भावना भडकवणारे वक्तव्य करू नये, असं देखील पोलिसांनी म्हटलं आहे.
पोलिसांनी घातलेल्या अटीमध्ये सदर सभा दि.०१ रोजी १६.३० ते २१.४५ या वेळेतच आयोजीत करावी. तसेच कार्यक्रमाचे ठिकाण आणि वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करु नये, असे सांगण्यात आले आहे. तसेच सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वंयशिस्त पाळावी. सभेला येताना व परत जाताना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करु नये, असं म्हटले आहे. कार्यक्रमा दरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगु नये, अगर प्रदर्शन करु नये व शस्त्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करु नये, अशी तंबीही पोलिसांनी दिली आहे.
राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिल्यानंतर भीम आर्मी (Bheem Army) चांगलीच आक्रमक झाली आहे. राज ठाकरेंनी सभेल पोलिसांनी दिलेल्या अटींचे उल्लंघन केले, तर आम्ही सभा बंद पाडू, असा इशारा भीम आर्मीने दिला आहे. राज ठाकरेंच्या सभेसाठी पोलीस प्रशासनाने १६ अटी घालून दिलेल्या आहेत. त्याच उल्लंघन ठाकरेंकडून सभेत झाले तर या सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati shiwaji Maharaj), डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या घोषणा देऊन सभा बंद पाडू, असा इशारा भीम आर्मीने दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून भीम आर्मीचे कार्यकर्ते हे राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेला जाणार असल्याच भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे (Ashok Kamble) यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्याविरोधात मनसेनं (MNS) आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला ३ मे रोजीचा अल्टिमेटम दिला आणि तेव्हापासूनच राज्यात हिंदुत्व, हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंग्यांबाबत राजकारण सुरु झाले. ३ मेच्या अल्टिमेटमपूर्वी औरंगाबादमध्ये होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे.