हनुमान चालिसा म्हणनं राजद्रोह आहे का?

मुंबई । प्रतिनिधी

महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) विरूद्ध भाजपा (BJP) हा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. मागील काही दिवसांमध्ये शिवसैनिकांनी मोहित कंबोज (Mohit Kamboj), किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हल्लाबोल करताना राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा छेडला आहे.

दरम्यान आज सर्वपक्षीय बैठकीवरही भाजपाने का बहिष्कार टाकलं याचं कारणंही सांगितलं आहे. सरकार संवादाला जागा ठेवत नाही, झुंडशाहीने वागत असल्याचं सांगत ज्या बैठकीला मुख्यमंत्रीच नाहीत तेथे कशाला जायचं असा सवाल विचरला आहे. यावेळेस त्यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालिसा म्हणण्याचं आव्हान देणार्‍या राणा दाम्पत्यांवर लावलेल्या राजद्रोहाच्या गुन्ह्यावरूनही गृहमंत्रालयावर टीका केली आहे.

केंद्र सरकारने झेड सुरक्षा दिलेल्यांवर हल्ला होत असेल, पोलिस संरक्षण मिळत नसेल तर ती चिंताजनक बाब असल्याचं सांगत याबाबत लक्ष वेधण्यासाठी होम सेक्रेटरींना पत्र पाठवल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं आहे. दरम्यान याच प्रश्नी भाजपा नेते किरीट सोमय्या दिल्लीत पोहचले आहेत.

मुंबईत जे काही चाललंय ते मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावरच सुरू असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी लावला आहे. सध्याचं सरकार सर्वाधिक असहिष्णू सरकार असल्याचं म्हटलं आहे. हनुमान चालिसा म्हणण्यावर एवढा आक्षेप का? भारतात हनुमान चालिसा नाही म्हणणार मग काय पाकिस्तान मध्ये म्हणणार असा संतापजनक सवाल केला आहे.